सोन्याचे दागिने विकायचे सांगून तब्बल १४ लाखांचा गंडा; ब्रह्मपुरी येथील प्रकार : दोघांवर गुन्हा दाखल
By परिमल डोहणे | Published: March 8, 2024 08:18 PM2024-03-08T20:18:30+5:302024-03-08T20:19:54+5:30
सोन्याचे दागिने सांगून नकली पिवळ्या धातूच्या माळा देऊन तब्बल १४ लाखांनी गंडविल्याचा प्रकार ब्रह्मपुरी येथे उघडकीस आला.
ब्रह्मपुरी: सोन्याचे दागिने सांगून नकली पिवळ्या धातूच्या माळा देऊन तब्बल १४ लाखांनी गंडविल्याचा प्रकार ब्रह्मपुरी येथे उघडकीस आला. गुरुवार दि. ७ फेब्रुवारी रोजी भास्कर आनंदराव हुमने यांनी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार केली आहे. त्यानुसार ब्रह्मपुरी पोलिसांनी एक महिला व एक पुरुष अशा दोघांवर कलम ४२०, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याअनुषंगाने ब्रह्मपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहे.
भास्कर आनंदराव हुमणे हे आरमोरी येथील रहिवासी असून सीडीसीसी बँक वैरागड येथे सचिव पदावर कार्यरत आहेत. २४ फेब्रुवारी रोजी हुमणे चारचाकी वाहनाने जात असताना ब्रह्मपुरी येथील तहसील कार्यालय परिसरात चहा पिण्यासाठी थांबले. दरम्यान एक इसम त्यांच्याजवळ येऊन पांढऱ्या धातूचे गोले शिक्के बदलवायचे असल्याचे सांगितले. हुमणे यांनी तेथील एक शिक्का शंभर रुपयाला खरेदी केला. यावेळी दोघांनी एकमेकांना नंबर दिले. दरम्यान दुसऱ्या दिवशी त्या इसमाने हुमने यांना कॉल करून काम असल्याचे सांगून भेटायला बोलावले. २७ फेब्रुवारीला ते दोघेही ख्रिस्तानंद चौकात भेटले. यावेळी त्या व्यक्तीसोबत एक महिला होती. त्या महिलेचे पिवळ्या धातूची सोन्याची माळ दाखवून ती विकायची असल्याचे सांगितले. तसेच सॅम्पल म्हणून तीन मणी हुमणे यांना देऊन सोनाराकडून तपासणी करण्यास सांगितले.
त्यांनी तपासणी केली असता ते सोन्याचे असल्याचे समोर आले. २९ फेब्रुवारीला ख्रिस्तानंद चौकात ते भेटून पिवळ्या धातूच्या सुमारे तीन किलोच्या माळा १४ लाखांना विक्री करणार असल्याचे सांगितले. त्यांनीसुद्धा खरेदी करण्यास संमती दर्शवली. त्यांनी मित्रांकडून, घरून पैशाची तडजोड केली. २ मार्चला ख्रिस्तानंद चौकात भेटून १४ लाख रुपये देऊन त्या दोन्ही माळा खरेदी केल्या. दरम्यान हुमणे यांच्या पत्नी त्या माळा घेऊन वडसा येथील सोनाराला दाखविल्या. यावेळी त्या सोनाराने त्या दोन्ही माळा बनावट असल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे समोर येताच हुमणे यांनी ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन गाठून १४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.