चार तालुक्यांनाच जादा सेंद्रीय खत पुरवठा, शेतकरी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:46 AM2019-06-22T00:46:26+5:302019-06-22T00:46:56+5:30
जिल्हा परिषद कृषी विभागाने भद्रावती, राजुरा, कोरपना व पोंभूर्णा तालुक्यांना सेंद्रीय खताचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला. तुलनेने अन्य तालुक्यांना अल्प खत पुरविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. खरीप हंगामातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन जादा खत पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषद कृषी विभागाने भद्रावती, राजुरा, कोरपना व पोंभूर्णा तालुक्यांना सेंद्रीय खताचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला. तुलनेने अन्य तालुक्यांना अल्प खत पुरविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. खरीप हंगामातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन जादा खत पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. दरम्यान, या प्रश्नावरून जि. प. च्या विरोधी पक्षातील सदस्यांनी गुरूवारी स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये सेंद्रीय खत पुरवठ्याचाही समावेश आहे. खरीप हंगामाकरिता कृषी विभागाने सेंद्रीय खत पुरवठ्याचे नियोजन केले होते. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तालुकानिहाय पंचायत समितीस्तरावर सेंद्रीय खताचा पुरवठा करण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना सारख्या प्रमाणावर खताचा पुरवठा करणे आवश्यक होते. मात्र, यात दुजाभाव करण्यात आला. चंद्रपूर तालुक्याला सेंद्रीय खताच्या ६५२ बॅग, बल्लारपूर तालुका ५००. मूल तालुका ८०० बॅग, सावली ८०० बॅग, सिंदेवाही ५०० बॅग, नागभीड ५०० बॅग, ब्रह्मपुरी ५००, चिमूर ५००, वरोरा तालुका ८००, भद्रावती पाच हजार २२० बॅग, राजुरा एक हजार ५०० बॅग, गोंडपिपरी ५०० बॅग, पोंभूर्णा एक हजार बॅग आणि जिवती तालुक्याला ५०० बॅगचा सेंद्रीय खताचा पुरवठा करण्यात आला. जिल्ह्यात चिमूर, ब्रह्मपुरी, वरोरा, सिंदेवाही तालुक्यात शेती करणाºयांची मोठी आहे.
याशिवाय तालुक्यात जिल्हा परिषद सदस्यांची संख्याही जास्त असल्याने सेंद्रीय खताचा पुरवठा करताना समान न्याय देणे गरजेचे होते. परंतु, भद्रावती तालुक्याला पाच हजार २२०, राजुरा एक हजार ५००, कोरपना १ हजार ५००, पोंभूर्णा एक हजार सेंद्रीय खताचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे विरोधी पक्षातील सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना सेंद्रीय खताचा पुरवठा करावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी सदस्यांनी सभेप्रसंगी केली.
मागणीनुसार पुरवठ्याचे उत्तर
जिल्ह्यातील भद्रावती, राजुरा, कोरपना आणि पोंभूर्णा तालुक्यातून मागणी जास्त आली. त्यामुळे मागणीनुसार सेंद्रीय खताचा पुरवठा करण्यात आल्याचे आता जिल्हा परिषदेकडून सांगण्यात येत आहे. सेंद्रीय खतासाठी अजूनही निधी मिळणार आहे. त्यानंतर अन्य तालुक्यांनाही वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.