उभ्या धानपिकाची होतोय तणस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 11:33 PM2017-10-27T23:33:03+5:302017-10-27T23:33:19+5:30
निसर्गाची अवकृपा शेतकºयांची पाठ सोडायला तयार नाही. खरिपाच्या सुरूवातीला पावसाने दगा दिला तर आता हाती येण्याच्या स्थितीत असलेल्या धान पिकावर मावा-तुडतुडा,......
चंद्रपूर : निसर्गाची अवकृपा शेतकºयांची पाठ सोडायला तयार नाही. खरिपाच्या सुरूवातीला पावसाने दगा दिला तर आता हाती येण्याच्या स्थितीत असलेल्या धान पिकावर मावा-तुडतुडा, करपा, लाल्या रोगाने आक्रमण केल्याने उभ्या धान पिकाची तणस होत आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला असून शेती करावी की सोडावी, असा प्रश्न शेतकºयांना भेडसावत आहे. महागड्या औषधांची फवारणी करून धानावरील रोगाचा प्रादुर्भाव दूर होत नसल्याने कृषी विभागाने सुचविलेल्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याची स्थिती जिल्हाभर दिसून येत आहे. त्यामुळे आता मायबाप शासनाने तरी नुकसानग्रस्त भागाचे सर्वे करून शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
पोंभुर्णा : वातावरणातील सततच्या बदलामुळे मानवी जीवनाप्रमाणेच धानपिकाला सुद्धा विविध रोगांची लागण झाली असून विविध प्रकारच्या औषधांचा वापर करुन फवारणी करण्यात आली. त्यात काही प्रमाणात रोगांवर नियंत्रण झाल्याने थोडेफार तरी धान्य घरात आणता येईल, या आशेत असलेल्या शेतकºयांवर पाणी फेरले आहे. हातात आलेल्या धानपिकांवर मावा तुडतुडा या रोगाने आक्रमण केले असून तालुक्यातील हजारो हेक्टरमधील हिरव्या धानपिकावरचे पिवळ्या तणसात रुपांतर झाले आहे. या तणसाची कापणी करणे सुद्धा अवघड झाल्याने परिसरातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. कृषी विभागानेही शेतकºयांकडे दुर्लक्ष केल्याने मार्गदर्शन कुणाकडे घ्यायचे, या संकटात शेतकरी सापडला आहे.
सध्या धानपिक गर्भाशयाच्या बाहेर पडून लोंबी तयार झाले आहे. आतापर्यंत उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून महागडे खत, औषधी वापरुन पिकांच्या वाढीसाठी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र हातात आलेल्या धानपिकावर मावा तुुडतुडा या रोगानी आक्रमण केल्याने या रोगाला आवर घालने शेतकºयांना कठीण झाले आहे. विविध औषधांचा वापर करुनही सदर रोग नियंत्रणात येत नसल्याने धानपिक तणस होत आहे. तालुकास्तरावर कृषी विभागाचे कार्यालय असून त्यांचे सुद्धा शेतकºयांना पाहिजे त्याप्रमाणात मार्गदर्शन मिळत नाही. कार्यालयात कर्मचारी राहत नसल्याचे शेतकरी सांगतात. मग हे कर्मचारी गावातील शेतकºयांच्या शेतावर किंवा गावात नाही, कार्यालयात नाही मग जातात कुठे, अशी चर्चा परिसरातील शेतकºयांमध्ये सुरु आहे.
परिसरातील अनेक शेतकºयांनी महागडी औषधांची फवारणी केली. त्यामुळे काही प्रमाणात रोगांवर नियंत्रण मिळविता आले. मात्र आता रोग अधिक बळावला आहे. यातच रानटी डुकरांचाही धोका वाढला असून शेतपिकाची नासाडी करीत आहेत. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ सर्वे करून आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.
बल्लारपूर तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी संकटात
येनबोडी : बल्लारपूर तालुक्यातील कवडजई, मानोरा, इटोली, पळसगाव, किन्ही या शेतशिवारात धान पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. सध्या धानपीक निसवत आहे. मात्र या अवस्थेत धान पिकावर करपा, मावा- तुडतुडा, पाने गुंडाळणारी अळी अशा विविध रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांच्या धान पिकाची तणस झाली असून आहे. प्रत्येक्ष शेतामध्ये पाहणी केली असता, पळसगाव शेतशिवारातील गणपत ढोले, बापुराव ठाकरे, किन्हीचे लता केशव माऊलीकर, विश्वनाथ शेवकर, नुसाजी खोब्रागडे, कवडजई येथील नामदेव माऊलिकर, दीपक माऊलिकर, संतोष उपरे व इतर शेतकºयांचे धान पिकाची पुर्णत: तणस झाली आहे. यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांनी रोग नियंत्रित करण्यासाठी कृषी केंद्र संचालकाच्या सल्ल्यानुसार विविध औषधांची फवारणी करीत आहेत. मात्र रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे.
लागवड खर्चही निघण्याची आशा मावळली
शंकरपूर : धान पिकावरील विविध रोगाच्या प्रादुर्भावामुळे हाती आलेले धानपीक जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे यावर्षी धानपीक लागवडीचा खर्चही भरून निघण्याची आशा मावळली आहे. शंकरपूर व परिसरात मोठ्या प्रमाणात धानपिकाची लागवड केली जाते. मात्र विविध रोगामुळे शेतकरी हतबल झाला असून महागडी औषधांची फवारणी करुन सुद्धा कोणताच फायदा होत नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. उघड्या डोळ्याने करपलेले पीक पाहताताना शेतकºयांचे रडू कोसळत आहे. शंकरपूर, चकलोहारा, चकजारेपार, डोंगरगाव, डोमा, किटाळी, हिरापूर, कवडशी, दहेगाव, इरव्हा झरी, नवतळा, पिंपळगाव, शिवरा आदी गावात मोठ्या प्रमाणात धान पिक घेतले जाते. धान पीक गर्भावस्थेत असताना चांगले होते. परंतु अचानकपणे रोगाची लागण झाली आणि लोंब सुकायला लागले आहे. तर हा प्रकार वाढत जावून पिकाची तणस होत आहे. रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांनी कृषी केंद्रातून महागडी औषधी घेवून फवारणी केली. परंतु त्या औषधी कोणताच फायदा शेतकºयांना होताना दिसत नाही. सुरुवातीला एका बांधीत थोडाशा जागेवर लागण होते, त्यानंतर दोनच दिवसात पूर्ण शेतात हा रोग पसरत असून पुर्णपणे पणे धान तणस होत आहे.
मांगली येथे धानपिकांवर विविध रोगांचे आक्रमण
नागभीड : धान ऐन कापणीला आले असताना मांगली येथे मावा आणि तुडतुडा रोगाचे कहर केला आहे. परिणामी शेतकरी वर्ग संकटात सापडला असून कृषी विभागाने यावर उपाय योजना सुचवावी, अशी मांगलीचे नवनियुक्त सरपंच दिनकर माकोडे यांनी केली कृषी विभागाकडे केली आहे. मांगली हे १२०० लोकवस्तीचे गाव असून येथील ९९ टक्के लोक शेतकरी आहेत. येथील प्रत्येक कुटुंबाकडे काही ना काही, शेती आहे. प्रत्येकांनी कर्ज काढून व उसनवार घेवून धान पिकाची लागवड केली. आता हा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून धान कापणीला आला आहे. आता ऐन भरात असलेल्या व कापणीला आलेल्या धानावर मावा तुडतुड्यासह विविध प्रकारच्या रोगांनी आक्रमण केल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. हंगाम वाचविण्यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या फवारण्या करीत असले तरी या फवारण्यानाही हे रोग दाद देत नसल्यामुळे शेतकरी आणखीच भयभीत झाला आहे. कृषी विभागाने यावर उपाययोजना करावी, असे निवेदन दिनकर माकोडे यांनी कृषी विभागाला दिले आहे.
तातडीने सर्वे करुन मदत द्यावी : बाळू धानोरकर
वरोरा : चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील शेतकरी भात पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र सध्या भात पिकावर सध्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने धानपिक घेणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे भात पिकाचे तातडीने सर्वे करुन भात उत्पादक शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आ. बाळू धानोरकर यांनी केली आहे. सध्या उभे असलेल्या भात पिकावर करपा, मावा, तुडतुडा, पाने गुंडवळणारी अळी यासारख्या विविध कीड रोगांनी आक्रमण केल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. गोंदिया जिल्ह्यातील दोन शेतकºयांनी भाताचे उभे असलेले पीक जाळून टाकल्याची दुदैवी घटनाही घडल्या असून शासनाने याकडे लक्ष द्यावे.