नेत्रहितांच्या संगितीकीने बल्लारपूरकरांना प्रफुल्लित केले
By admin | Published: April 18, 2017 12:52 AM2017-04-18T00:52:45+5:302017-04-18T00:52:45+5:30
देवाने त्यांना दृष्टी नाही दिली. पण, अंधारात जगावे कसे, याकरिता मार्ग काढण्याकरिता त्यांना बुद्धी, मन आणि गायन कला दिली.
कलावंतांनी व्यक्त केली संवेदना : मन आणि बुद्धी शाबूत, हे नियतीचे उपकार !
बल्लारपूर : देवाने त्यांना दृष्टी नाही दिली. पण, अंधारात जगावे कसे, याकरिता मार्ग काढण्याकरिता त्यांना बुद्धी, मन आणि गायन कला दिली. हीच कला त्यांच्या जगण्याचे, त्यांच्या सामर्थ्याचे साधन बनले आहे. पुढे बसून असलेल्या श्रोत्यांना ते बघू शकत नाहीत. पण, आपल्या गायन व संगीताने ते प्रफुल्ल होतात याची जाणीव त्यांना होते. आणि म्हणून आपले ्नगायन अधिकाधीक कसे समृद्ध होणार याच्या प्रयत्नात ते असतात. या अशा कलागुणी नेत्रहीन गायक वादकांनी येथील श्रोत्यांची मनें जिंकली, ती कायमची!
हनुमान जयंतीनिमित्त येथील किल्ला वार्डातील जोड हनुमान माता मंदिराच्या पटांगणावर नेत्रहिनाचा गायनाचा कार्यक्रम झाला. १२ ते ३० वयोगटातील हे नेत्रहीन कलावंत वाशिम जिल्ह्यातील दूरवरच्या केकतउमरा या खेडेगावाचे!
त्यांच्या गायन समूहाचे नाव चेतन सेवांकुर असे आहे. भक्तीगीत, राष्ट्रीय, प्रेम आणि उडत्या चालीवरचे अशा सर्वच प्रकारची गीतं ऐकूवन त्यांनी श्रोत्यांना संगीत स्वरांनी भिजविले. या संगीत समूहाचा प्रमुख १२ वर्षीय जन्मांध चेतन पांडूरंग उचितकर हा आहे. तो गातो, वाद्य वाजवितो आणि व्याख्यानही करतो. यात त्याने नेत्रहिनांचे मनोगत मांडले. त्यांची संवेदना ऐकून श्रोत्यांची मनं गलबलून आलीत. महिलांच्या डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्यात. तो म्हणाला, जग सुंदर आहे, असे सारेच जण सांगतात. पण, ते आम्हाला बघता येत नाही. आई- बाबा आम्हाला सतत आधार देतात. आमची काळजी घेतात. पण ते कसे आहेत, काळे की गोरे आम्हाला बघता येत नाही. देवाचे एका गोष्टीकरिता मात्र आभार मानावे लागेल.
त्याने आमची दृष्टी हिरावली. पण, सुदृढ मन आणि बुद्धी दिली आहे. तेच आमचे बळ आहे. या संगीत समूहात प्रविण कठाडे, कैलाश पानबुडे, संदीप भगत, विकास गाडेकर, गौरव मालक, दशरथ जोगंदड, रुपाली फुलसावंगे, कोमल खांडेकर, लक्ष्मी वाघ, तुळशिदास तिवारी, तद्वतच या साऱ्याबाबत पालकाची भूमिका बजावत असलेले पांडुरंग उचीतकर हे आहेत.
या साऱ्यांचा परिचय व कृर्तत्व प्रा. मनिष कायरकर यांनी यावेळी करवून दिला. जोड हनुमान मंदिराचे पदाधिकारी वामन मांढरे, सुधाकर घुबडे, राजू मांढरे, प्रदीप लोखंडे, राजू खनके, निलेश सज्जनवार, सुधीर कायरकर यांनी तद्वतच नगराध्यक्ष हरिष शार्म यांनी या संगीत समूहातील सदस्यांचा सत्कार केला.
शर्मा यांनी याप्रसंगी आपले मनोगतही व्यक्त केले. संचालन प्रा. मनिष कायरकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
गायन कार्यक्रमातून मिळालेल्या मानधनातून काही धन समाज कार्याकरिता हे नेत्रीहन खचर करतात, याची माहिती श्रोत्यांना त्यांचा परिचय देताना झाली. आणि त्यांच्या या कार्यालाय आर्थिक मदतीचे हात श्रोत्यांमधून पुढे आले. आणि बघता बघता २० हजार रुपये गोळा झालेत. चांगल्या कामाकिरता दातृत्व मागे राहात नाही हेच त्यातून दिसून आले.