अड्याळ टेकडीचा चेहरामोहरा बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:24 AM2019-05-26T00:24:50+5:302019-05-26T00:25:41+5:30
शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थेच्या पुढाकाराने भूवैकुंठ अड्याळ टेकडीवर नवीन बांधकामे झाली आहेत. त्यामुळे टेकडीचा चेहरामोहरा बदलला आहे. सेवाकार्याची प्रेरणा घेण्याकरिता शेकडो नागरिक दर्शनाकरिता येतात.
नागभीड : शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थेच्या पुढाकाराने भूवैकुंठ अड्याळ टेकडीवर नवीन बांधकामे झाली आहेत. त्यामुळे टेकडीचा चेहरामोहरा बदलला आहे. सेवाकार्याची प्रेरणा घेण्याकरिता शेकडो नागरिक दर्शनाकरिता येतात.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने गीताचार्य तुकारामदादा यांनी आपल्या साधनेसाठी अड्याळ टेकडीची निवड केली. टेकडीवर त्यांनी अखंड १२ वर्षे मौन धारण करून साधना केली. त्यानंतर ते लोकसेवेसाठी बाहेर निघाले. संबंध महाराष्ट्र व देशात दादाच्या समाजसेवेचे कार्य सुरू असताना अड्याळ टेकडीवर त्यांनी विशेष लक्ष पुरविले. टेकडीवर त्यांनी स्वत:च्या कल्पनेतील सार्वभौम असे एक गाव निर्माण केले. त्याचबरोबर अड्याळ टेकडीच्या पंचक्रोशीत असलेल्या खेड्यांना स्वावलंबनाची दीक्षा देण्याचे कार्यही अविरत केले. अशा महान आणि आदर्श समाजसेवकाचे ८ जून २००६ रोजी निधन झाले. अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजर झाले. अशाच मान्यवरांपैकी शेगावच्या गजानन महाराज ट्रस्टचे शिवशंकर पाटील उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत शिवशंकर पाटील यांनी गीताचार्य तुकारामदादा आणि आपल्यात काय नाते होते, हे सांगून ज्या ठिकाणी दादांना चिरशांती देण्यात आली त्या ठिकाणी दादाच्या समाधी स्थळासाठी शेगाव संस्थेने दोन कोटी रूपये खर्च करणार असल्याची ग्वाही दिली.
शिवशंकर पाटील यांच्या ग्वाहीनुसार दादाच्या समाधीस्थळांचे बांधकाम हाती घेण्यात आले. हे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. समाधीस्थळांचे संपूर्ण बांधकाम राजस्थानी पद्धतीचे असून बांधकामासाठी लागणारा दगड आणि कारागीर राजस्थानातूनच मागविण्यात आले होते. या समाधी स्थळाव्यतिरिक्त आणखी इतर विविध बांधकामे करण्यात आली. समाधीस्थळाच्या पूर्वेला विशाल जलाशय, पुष्पवेली आणि विविध प्रजातीच्या वृक्षांनी बहरलेली अड्याळ टेकडी आता सेवास्थळ झाली आहे. टेकडीवरी विलोभनीय बांधकामाने सौंदर्यात भर टाकली. गीताचार्य तुकारामदादा ज्या ठिकाणी बसून गुरुदेव भक्तांना मार्गदर्शन करीत तिथे सभागृह बांधण्यात आले. आणखी लहान-मोठी अनेक कामे करण्यात आली आहे. या कामाने अड्याळ टेकडीचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. अड्याळ टेकडीवर सुरू असलेले विविध उपक्रम ग्रामीण विकासाला चालना देणारी आहेत.
गीताचार्य तुकाराम दादानी राष्ट्रसंताच्या प्रेरणेतून शेकडो विधायक कामे केली. सामान्यांच्या हितासाठी झटले. ग्रामगीतेतील विचार आचरणात आणला. लोकांचे प्रबोधन करून चांगल्या मार्गाला लावले.
-घनश्याम नवघडे