वीज दरवाढी विरोधात धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2017 12:45 AM2017-07-02T00:45:21+5:302017-07-02T00:45:21+5:30
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या वतीने स्थानिक नगपालिका बचत भवन समोरील प्रांगणात वीज वितरण कंपनीने वीज देयकात भरमसाठ वाढ केली.
सरकारविरोधी घोषणा : वीज दरवाढ मागे घेण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर: बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या वतीने स्थानिक नगपालिका बचत भवन समोरील प्रांगणात वीज वितरण कंपनीने वीज देयकात भरमसाठ वाढ केली. वीज दरवाढ मागे घेण्याची मागणी करीत शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आहे. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
घरगुती वीज ग्राहकांना पूर्वी एका महिन्यांचे बील ४०० ते ५०० रूपये येत होते. मात्र एप्रिल महिन्यांपासून वीज देयक १२०० रूपये येत असल्याने वीज ग्राहकाचे कंबरडे मोडले आहे. या प्रकारमुळे वीज ग्राहकांत संताप व्यक्त केला जात आहे. राज्यातील सरकार सर्वसामान्य नागरिकांची लुटमार करीत असल्याचा गंभीर आरोप बीआरएसपीचे प्रदेश महासचिव राजू झोडे यांनी केला. वीज दरवाढ मागे घेण्यात आली नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
शहरातील बहुतेक वॉर्डात अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे तयार करण्यात आले. यावर कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले. मात्र अल्पावधीतच ठिकठिकाणच्या रस्त्याचे बांधकाम करताना निकृष्ट सहित्याचा वापर करून भ्रष्टाचाराला चालना देण्यात आणण्याचा आरोपही बिआरएसपीच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलनादरम्यान केला. तसेच सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शहरात जीवन प्राधिकरणाच्या माध्यामातून नळयोजनेतून पाणी पुरवठा केला जातो. येथे पिण्याच्या पाण्याच्या बिलातही अन्य शहराच्या तुलनेत अधिकचा दर आकारला जात आहे. परिणामी नागरिक वीज व पाणी बिलामुळे त्रस्त झाले आहेत. सदरची दरवाढ महागाईचा मार सोसणाऱ्या नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारी आहे. नागरिकांवर अन्याय लादण्याचा प्रकार आहे, असे बिआरएसपीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजू झोडे यांनी म्हटले आहे.
धरणे आंदोलन राजू झोडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत कोरडे, भास्कर भगत, वंदना तामगाडगे, नितीन साठे, स्नेहल ठाकरे, गीता चौधरी, माया मडावी यांच्यासह बल्लारपूर तालुक्यातील बीआरएसपीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.