अपयश ही यशाची पहिली पायरी - कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
By राजेश मडावी | Published: October 21, 2023 05:11 PM2023-10-21T17:11:03+5:302023-10-21T17:23:53+5:30
सरदार पटेल महाविद्यालयात गुणवंतांचा गौरव
चंद्रपूर : अब्राहम लिंकन हे अनेकदा निवडणुकीत पराभूत झाले. पण, त्यांनी हार मानली नाही. कल्पकता व चिकाटीने महाशक्तीशाली अमेरिका देशाचे राष्ट्रपती बनले. याचा अर्थ अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सरदार पटेल महाविद्यालयातील तृतीय पदवी वितरण व गुणवंत गौरव सोहळ्यात केले.
अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधा शांताराम पोटदुखे तर मंचावर सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सहसचिव डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, जिनेश पटेल, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्राचार्य श्याम धोपटे, प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, विद्यापीठ वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. जयेश चक्रवर्ती, संजय रामगिरवार, डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार उपस्थित होते.
यावेळी ६३ गुणवत्ता यादीत समाविष्ट व सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्व. ओंकारनाथ शर्मा शिष्यवृत्तीधारक आणि परीक्षा पे चर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. माजी विद्यार्थी संघातर्फे १४ विद्यार्थी तर महाविद्यालयातील प्राध्यापकांद्वारे प्रायोजित ५३ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. डॉ. दीक्षित यांनी विचार मांडले. सिनेट सदस्य रामगिरवार यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. माधुरी कटकोजवार व माजी विद्यार्थी संघातर्फे प्राचार्य धोपटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य पी. एम. काटकर यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. महेंद्र बेताल, प्रा. स्नेहल रायकुंडलिया यांनी केले. डॉ. माधमशेट्टीवार यांनी आभार मानले.