अल्प मोबदल्यासाठी निराधारांची फरफट
By admin | Published: January 14, 2017 12:40 AM2017-01-14T00:40:40+5:302017-01-14T00:40:40+5:30
शासनाच्या नोटबंदीचा फटका ग्रामीण भागातील निराधार लाभार्थ्यांना बसला आहे. त्यांना बॅकेत रांगेत उभे राहून पैसे काढणे जिकरीचे झाले आहे.
नोटबंदीचा फटका : क्षमता नसताना रागेंत उभे राहण्याचा संघर्ष
पोंभुर्णा : शासनाच्या नोटबंदीचा फटका ग्रामीण भागातील निराधार लाभार्थ्यांना बसला आहे. त्यांना बॅकेत रांगेत उभे राहून पैसे काढणे जिकरीचे झाले आहे. तरुण व्यक्तींच्या धक्काबुक्कीत त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नोटबंदीमुळे निराधारांची फरफट सुरू झाली आहे.
शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, वृद्धपकाळ योजना सुरू आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील अनेक निराधार गरीब कुटुंबातील ज्येष्ठ नारिक व वृद्ध महिला घेत आहेत. मात्र बँकेत जमा करण्यात आलेली रक्कम काढण्यासाठी या निराधार लाभार्थ्यांना नोटबंदीच्या फटक्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वृद्ध रांगेत उभे असताना चक्कर येवून पडण्याचे प्रकार अनेकदा घडत आहेत. अनेक वृद्ध हातात काठीच्या आधाराने एक कि.मी अंतरावरुन बँकेतून पैसे काढण्यासाठी येत आहेत. ते पोहोचल्या बरोबर रांगेत उभे राहतात. त्यातच बँकेमध्ये ५०० रुपयांची नवीन नोट न आल्याने केवळ दोन हजार रुपयांची नोट मिळत आहे. वृद्ध व निराधार लाभार्थ्यांना दोन महिन्याचे १ हजार २०० रुपये मिळत आहेत. परंतु नोटांअभावी बँकेलासुद्धा निराधारांचे मानधन अदा करणे कठिण जात आहे. परिणामी या निराधारांना अनेकदा आल्या पावलीच परत जावे लागत आहे. तर देवाडा खुर्द येथील वैनगंगा कृष्णा बँकेमध्ये एक दिवसा आड दोन हजार रुपयेच मिळत असल्याने बँकेतील खातेदारांची प्रचंड रांग लागत असते. त्यात तरुण वर्ग वृद्ध लाभार्थ्यांना धक्के मारीत असतात. त्यामुळे वृद्धांचे हाल होत आहेत. बँकेचे कर्मचारी आत असल्याने त्यांना बाहेरील प्रकार काहीच माहिती नसतो.
रांगेमध्ये उभे असताना धक्काबुकीमध्ये एका निराधार लाभार्थ्यांच्या अंगावर अनेक तरुण पडले. सुदैवाने तो व्यक्ती बचावला. तसेच अनेक महिलांमध्ये लाईनमध्ये उभ्या असताना अंगावर पडल्याचे वास्तवसुद्धा पहायला मिळाले. (तालुका प्रतिनिधी)