रेन वॉटर हार्वेस्टिंग न केल्यास होणार २० हजारांचा दंड; महापालिकेने सुरू केली जनजागृती
By साईनाथ कुचनकार | Published: June 20, 2023 03:54 PM2023-06-20T15:54:01+5:302023-06-20T15:56:20+5:30
प्रत्येक घरासाठी अनिवार्य
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग मोहीम राबविली जात आहे. परिसरातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी प्रत्येकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारणे महापालिकेने अनिवार्य केले आहे. दरम्यान, ही यंत्रणा उभारली नाही, तर २० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात जनजागृती केली जात आहे.
पावसाची अनिश्चितता, वाढते तापमान व विहीर-बोअरवेलद्वारे केल्या जात असलेल्या पाण्याच्या उपशाने जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. आज पाण्याची बचत न केल्यास पुढील काळ कठीण असणार आहे. मुबलक पाणी हवे असल्यास पावसाचे पाणी वाचविणे हा एकमेव उपाय आहे. याकरिता रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे आवश्यकच आहे. याकरिता शासनातर्फे जलशक्ती अभियान व मनपातर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग अभियान राबविले जात आहे.
नवीन बांधकाम करण्यास परवानगी घेणाऱ्या बांधकामधारकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे सक्तीचे करण्यात आले आहे. शहरातील सर्व बोअरवेलधारक, विहिरी असणारी घरे, मोठ्या इमारतींना (अपार्टमेंट) रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे मनपातर्फे अनिवार्य करण्यात आले आहे.
२० हजारांचा दंड
ज्या बोअरवेलधारक, विहिरी असणारी घरे, मोठ्या इमारतींना (अपार्टमेंट) रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले नाही त्यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. घराच्या छताच्या क्षेत्रफळानुसार अनुदान व मालमत्ता करात पुढील तीन वर्षांपर्यंत २ टक्के सूट सुद्धा देण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.