शिक्षक बदल्यांसाठी बनावट प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:48 PM2018-07-20T22:48:21+5:302018-07-20T22:50:51+5:30
जिल्हा परिषदअंतर्गत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांची जिल्हाअंतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पार पडली. या बदलीसाठी विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि दोनमधील काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून ग्रामविकास विभागाच्या बदली सुधारीत धोरणाला ठेंगा दाखविल्याचे पुढे येत आहे.
राजेश मडावी।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषदअंतर्गत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांची जिल्हाअंतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पार पडली. या बदलीसाठी विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि दोनमधील काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून ग्रामविकास विभागाच्या बदली सुधारीत धोरणाला ठेंगा दाखविल्याचे पुढे येत आहे. विशेष म्हणजे शिक्षक बदलीसाठी भाग एक व दोन संवर्गातील नियमांचा आधार घेऊन सादर केलेल्या प्रमाणपत्राद्वारे आवडत्या ठिकाणी बदली करून घेतलेल्या शिक्षकांची राज्यातील बहुतेक जिल्हा परिषदने पडताळणी मोहीम सुरू केली आहे. परंतु, चंद्रपूर जिल्हा परिषद प्रशासनाने यासंदर्भात मौन बाळगण्याचे कारण काय असा प्रश्न अन्यायग्रस्त शिक्षकांकडून विचारला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या गट क (वर्ग-३) व गट ड (वर्ग ४) मधील कर्मचाºयांच्या जिल्हाअंतर्गत बदलीचे धोरण सरकारने निश्चित केले होते. या धोरणानुसारच जि.प. शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या केल्या जात होत्या. परंतु शिक्षक संवर्गाची मोठी संख्य, त्यांच्यावर इतर संवर्गापेक्षा असलेल्या कामाचे भिन्न स्वरूप लक्षात घेवून बदलीबाबत स्वतंत्रपणे विचार करुन ग्रामीण विकास विभागाने २७ फेब्रुवारी २०१७ ला सुधारीत धोरण लागू केले. या धोरणानुसार वेगवेगळ्या संवर्गानुसार बदल्या झाल्या. बदलीप्राप्त शिक्षकांना प्रामुख्याने विशेष संवर्ग एक, दोन, तीन व चार असे वेगवेगळे गट करुन त्यानुसार आॅनलाईन प्रक्रियेद्वारे बदलीचे अर्ज मागविण्यात आले होते. या प्रक्रियेला सामोरे गेलेल्या सुमारे अडीच ते तीन हजार शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या. परंतु विशेष संवर्ग एक व दोन मधील १०० पेक्षा अधिक शिक्षकांनी आॅनलाईन प्रक्रियेमध्ये बनावट प्रमाणपत्र तसेच दस्ताऐवज सादर करून जिल्हाअंतर्गत बदलीचा फायदा लाटला. बदलीप्रक्रिया आटोपल्यानंतर शासनाच्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जि.प.नेही संवर्ग एक व दोन मध्ये बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी करून तसा अहवाल सादर करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. पण पाणी कुठे मुरले, असाही प्रश्न अन्यायग्रस्त शिक्षकांनी विचारला जात आहे. संबंधित गटशिक्षणाधिकाºयांनी या कागदपत्रांची २७ फेब्रुवारी २०१७ च्या सुधारीत बदली धोरणाच्या निकषानुसार तपासणीच केली नसल्याचा संशय निर्माण झाल्याने प्रामाणिक शिक्षकांमध्ये प्रचंड अस्वस्था निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये सध्या संवर्ग एक- दोनच्या बदलीप्राप्त शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी सुरू आहे. पण चंद्रपूर जि.प.ने दुर्लक्ष केल्याचा आरोप शिक्षकांनी केला.
विशेष संवर्ग शिक्षक एक व दोन म्हणजे काय ?
जिल्हा परिषदेतअंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गासाठी शासनाने १० क्षेत्रघटक तयार केले. यामध्ये अवघड क्षेत्र, सर्वसाधारण, बदली वर्ष, बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा, शिक्षक, सक्षम प्राधिकारी, बदल्यांचे अधिकारप्राप्त शिक्षक, विशेष संवर्ग भाग एक व दोन आणि बदलीलाप्राप्त शिक्षकांचा समावेश आहे. विशेष संवर्ग शिक्षक एकमध्ये दुर्धर आजार, विधवा, कुमारीका, परितक्त्या, घटस्फोटीत आणि ५३ वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षिका व शिक्षकांचा समावेश होतो. भाग दोनमध्ये पती-पत्नीचे एकत्रीकरण या घटकावर बदली निश्चित केली जाते. १० क्षेत्र घटकांमधून एक व दोनमधील आॅनलाईन बदलीतच गौडबंगाल झाल्याने जिवती, राजुरा तसेच कोरपना शिक्षकांची शेकडो पदे रिक्त आहेत.
दिव्यांग प्रमाणपत्रावर संशय
जिल्हाअंतर्गत विशेष संवर्ग एक व दोनच्या आॅनलाईन प्रक्रियेमध्ये बनावट प्रमाणपत्र तसेच दस्ताऐवज सादर करून जिल्हाअंतर्गत बदलीचा फायदा लाटल्यासाठी काही शिक्षकांनी दिव्यांगाचे प्रमाणपत्र सादर केले. पण, हे पत्र एसएडीएम (सॉप्टवेअर फ ॉर एसेसमेंट आॅफ डिसेबिलीटी) नुसार प्रमाणित नाही, असाही संशय व्यक्त होत आहे. याच प्रश्नावर राज्यातील अनेक जि. प. मध्ये सध्या मोठे वादळ उठले आहे.
गडचिरोलीतही पडताळणी
विशेष संवर्ग एक व दोन मधील १०० पेक्षा अधिक शिक्षकांनी आॅनलाईन प्रक्रियेमध्ये बनावट प्रमाणपत्र तसेच दस्ताऐवज सादर केल्याची प्रकरणे उघडकीस आल्याने गडचिरोली जि. प. ने पडताळणी मोहीम सुरू केली. यासाठी समिती गठित करून सुनावणीदेखील घेतली जात आहे. शिक्षकांच्या या प्रकरणावर कारवाई करण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. पण, जि. प. चंद्रपूरमध्ये शांतता आहे.
अन्यथा वेतनवाढ बंद
शिक्षकांनी आॅनलाईन प्रक्रियेमध्ये बनावट प्रमाणपत्र तसेच दस्ताऐवज सादर करून जिल्हाअंतर्गत बदलीचा फायदा लाटला. बदलीप्रक्रिया आटोपल्यानंतर शासनाच्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जि.प.नेही संवर्ग एक व दोन मध्ये बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी करून तसा अहवाल सादर करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. पण पाणी कुठे मुरले, असाही प्रश्न अन्यायग्रस्त शिक्षकांनी विचारला जात आहे. दोष सिद्ध झाल्यास वेतनवाढ कायमची रद्द करण्याची तरतूद आहे.
जिल्हाअंतर्गत बदलीसाठी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण गंभीरच आहे. तातडीने चौकशी केली जाणार असून दोषी शिक्षकांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. शिक्षण क्षेत्रात असे प्रकार घडणे अनुचित असल्याने याप्रकरणात लक्ष लागणार आहे.
-कृष्णा सहारे,
उपाध्यक्ष, जि. प.