बापरे...चंद्रपूर जिल्हाधिकारी व सीईओंच्या बनावट स्वाक्षरीने २५ बेरोजगारांना गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 09:10 PM2021-09-14T21:10:02+5:302021-09-14T21:10:28+5:30
Chandrapur News चंद्रपूर जिल्हा परिषदमधील वर्ग-३ च्या नोकरीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संगणकीकृत बनावट स्वाक्षरी वापरून २२ ते २५ बेरोजगारांना लाखोेंनी गंडविल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषदमधील वर्ग-३ च्या नोकरीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संगणकीकृत बनावट स्वाक्षरी वापरून २२ ते २५ बेरोजगारांना लाखोेंनी गंडविल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणाबाबत जि. प. प्रशासन बुधवारी पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. ( Fake signatures of District Collector and CEO ruined 25 unemployed)
कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मिळेल ते काम युवक करण्यासाठी तयार होत आहेत. अशातच बल्लारपूरच्या एका व्यक्तीने काही युवकांना आपल्या जाळ्यात ओढून जिल्हा परिषदेतील कनिष्ठ साहायक व परिचराच्या नोकरीचे बनावट आदेश दिले. जिल्हा परिषदेत कोणतीही भरती प्रक्रिया राबविली नसताना २०१९-२० या आर्थिक वर्षात तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संगणकीकृत स्वाक्षरी चोरून हे आदेश तयार केल्याचे समजते.
सोमवारी दोन ते तीन युवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट घेऊन बनावट आदेश दाखविल्यानंतर त्यांनाही धक्काच बसला. बनावट आदेश देऊन फसवणूक झालेले आणखी २० ते २२ युवक असल्याची माहिती त्या युवकांनीच सीईओंना देत बल्लारपुरातील एका व्यक्तीने हा गोरखधंदा केल्याचेही सांगितले. जि. प. चे अधिकारी मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. परंतु, पोलिसांनी मूळ कागदपत्र मागितल्याने बुधवारी तक्रार केली जाणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सेठी यांनी लोकमतला दिली.
सोमवारी काही युवकांनी मला नोकरीचे आदेश दाखविले. परंतु, ते पूर्णपणे बनावट असल्याने पोलिसात तक्रार देण्याच्या सूचना केल्या आहे. पोलीस अधीक्षकांशीही याबाबत चर्चा झाली आहे.
- डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर.
नोकरीसाठी बनावटबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि वकिलांचा सल्ला घेऊन बुधवारी तक्रार दाखल करू. सोमवारी युवकांनी दिलेल्या तक्रारीसोबत असलेल्या बनावट आदेशावर तत्कालीन जिल्हाधिकारी व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संगणकीकृत स्वाक्षरी स्कॅन करून टाकण्यात आली आहे.
- श्याम वाखर्डे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर.