उपचार घेणाऱ्यांची माहिती कुटुंबीयांना द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:28 AM2021-05-09T04:28:49+5:302021-05-09T04:28:49+5:30
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. रुग्णाला पूर्णपणे बरे ...
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. रुग्णाला पूर्णपणे बरे होण्यासाठी जवळपास १० ते १४ दिवसांचा कालावधी लागत आहे. यादरम्यान रुग्णाजवळ कुटुंबातील कोणताही सदस्य राहत नसल्याने रुग्णाच्या प्रकृतीबाबत त्याला योग्य माहिती मिळविणे कठीण होत आहे. अशात रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास तत्काळ दुसरे रुग्णालय शोधण्यासाठीही त्यांची धावपळ होत आहे. ही बाब लक्षात घेता शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या प्रकृतीची, ऑक्सिजन पातळीची, हार्ट रेट, रक्तदाब, शुगर प्रमाण व सुरू असलेले उपचार तसेच इतर महत्त्वाची माहिती दर १२ तासांनी रुग्णांच्या कुटुंबीयांना देणे बाध्य करण्यात यावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. असे झाल्यास परिवाराला अतिरिक्त होत असलेली चिंता कमी होईल आणि रुग्ण औषधोपचाराला कशी प्रतिक्रिया देत आहे हे त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात येईल, असेही आ. जोरगेवार यांनी म्हटले आहे.