कुटुंबाचा आधार हिरावला, गाव झाले सुन्न

By admin | Published: July 14, 2016 12:56 AM2016-07-14T00:56:38+5:302016-07-14T00:56:38+5:30

मंगळवारच्या घटनेमुळे लाडज गाव सुन्न झाले आहे. वैनगंगेत नाव उलटण्याच्या घटनेला ३६ तास होऊनही अद्याप माधव मैंद व सचिन चनेकार...

The family was deprived of support, the village became numb | कुटुंबाचा आधार हिरावला, गाव झाले सुन्न

कुटुंबाचा आधार हिरावला, गाव झाले सुन्न

Next

३६ तासानंतरही पत्ता नाही : शोध मोहीम सुरूच
रवी रणदिवे ब्रह्मपुरी
मंगळवारच्या घटनेमुळे लाडज गाव सुन्न झाले आहे. वैनगंगेत नाव उलटण्याच्या घटनेला ३६ तास होऊनही अद्याप माधव मैंद व सचिन चनेकार या दोघांचा ठावठिकाणा लागलेला नाही. कितीतरी वर्षापासून गावकरी नावेने नदीतून ये-जा करतात, मात्र असा दुर्धर प्रसंग कधीच ओढवला नव्हता, त्यामुळे ही घटना अख्ख्या गावाच्या जिव्हारी लागली आहे. दिवसभर गावकरी नदीच्या काठावर बसून ‘ते’ दोघे आतातरी परत येतील, किमान त्यांची बातमी तरी कानी येईल, या आशेने प्रतिक्षेत होते. मात्र सायंकाळचा अंधार पडायला लागला तरी कसलीही बातमी कानावर न आल्याने गावकरी सुन्न मनाने पुन्हा गावाकडे परतले आहेत.
मन विषन्न करणारे हे चित्र आहे लाडज या गावचे. घडलेल्या घटनेमुळे व त्यातल्या त्यात दोघे वाहून गेल्याने लाडजवासीयांची मानसिकता कमालीची व्याकुळली आहे. वाहून गेलेले माधव मैंद हे घरचे कर्ते पुरूष होते. घरी दीड एकर शेती, तीन मुले व पत्नी असा संसाराचा गाडा चालवित असताना वैनगंगेने असा अचानक कोप केला. सचिन चंडीकार हा अविवाहित असला तरी आईवडीलांचा आधार होता. हा आधारच नियतीने हिरावून नेल्याने आईवडीलांचे शब्दही आता मुके झाले आहेत. शून्यात दृष्टी लावून ते मुकपणे आसवे गाळत आहेत. दोघेही वाहून जाणारे कर्ते असल्याने व घरची परिस्थिती हालाखिची असल्याने कुटुंबासमोर मोठा प्रश्न पडला आहे. या घटनेमुळे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्या वैनगंगेने आजवर या गावच्या पिढ्या पोसल्या, तिच वैनगंगा अशी वैरी कशी होऊ शकते, हा प्रश्न गावालाच अस्वस्थ करून जात आहे.
वैनगंगेच्या पुरामुळे गावाला धोका असल्याने १९९४ मध्ये सरकारने या गावाचे पुनर्वसन केले होते. मात्र निव्वळ सुपिक शेतजमिनीच्या प्रेमापोटी गावकरी गावातच राहात आहेत. आजवर ठिक चालत राहिले, मात्र मंगळवारच्या घटनेमुळे हे गाव भयभीत झाले आहे. जीवावर उदार होऊन शेती कसण्यापेक्षा पुनर्वसन झालेल्या नव्या ठिकाणी राहायला जायचे की याच काळ्या मातीची सेवा चालू ठेवायची, असा प्रश्न या गावाला पडला आहे. कालपासून दिवसभर त्यावरच गावाचे विचारमंथन सुरू आहे. प्रशासन व ग्रामस्थ यांच्या संयुक्त भुमिकेतून पुढे काहीतरी निर्णय निघणार की जगण्यामरण्यातील ही झुंज अशीच सुरू राहणार, हे येणारा काळच ठरवेल.
लाडजला पुराने अनेकदा वेढले तरीही केवळ काळ्या आईच्या सेवेसाठी गावकरी संकटे झेलत राहीले. येथील सुपिक शेतीमुळे कष्टाचे चीज झाले. आर्थिक सुबत्ता आली. त्याच काळ्या आईला सोडून जाण्याच्या कल्पनेने गावकरी कमालीचे हळवे झाले आहेत. रोख पिके देणारी ही शेती या गावाचा आधार होती. त्या बळावरच या गावाने पोटची मुले उच्च शिक्षणासाठी दूर ठेवली होती. त्यामुळे येथील मातीशी या गावाचे एक भावनिक नाते निर्माण झाले आहे. म्हणूनच प्रशासनही गावकऱ्यांसमोर हतबल झाले आहे. मात्र आता हा मोह आवरण्याचा इशारा कालच्या घटनेने दिला आहे. तो सर्वांनीच समजून घेण्याची गरज आहे.

लाडज येथे आमदारांची नागरिकांसोबत बैठक
वैनगंगा नदीत वाहून गेलेले माधव मैंद व सचिन चनेकार यांचा शोध अद्यापही लागलेला नाही. आमदार बंटी भांगडिया, उपविभागीय अधिकारी उमेश काळे, पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर, उपपोलीस विभागीय अधिकारी प्रविण परदेशी, प्रभारी तहसीलदार पुंडकर यांनी गावात येवून गावकऱ्यांशी चर्चा केली. धोका लक्षात घेवून पुनर्वसन का गरजेचे आहे, हे पटविण्यचा प्रयत्न केला. या बैठकीला सर्वच गावकरी उपस्थित होते.

 

Web Title: The family was deprived of support, the village became numb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.