शेत कोरडे आणि पाणी शेतकऱ्याच्या डोळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 05:00 AM2020-08-02T05:00:00+5:302020-08-02T05:00:15+5:30
पऱ्हे१५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्यांची रोवणी करण्यात येते.यावर्षीच्या हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आवते आणि पऱ्हे नियोजित वेळेतच भरले. पण अगदी हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाने आपला लहरीपणा दाखविला . जून व जुलै या संपलेल्या पावसाच्या दोन महिन्यात एकही मोठा पाऊस या धानपट्ट्यातील तालुक्यांत पडला नाही. काही शेतकऱ्यांनी मोटर आणि इंजिनच्या पाण्यावर रोवणी केली.
घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : यावर्षी हंगामाच्या अगदी प्रारंभापासून पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांची अवस्था पळता भूई थोडी झाली आहे. मात्र याही परिस्थितीवर मात करत शेतकऱ्यांनी काही प्रमाणात नैसर्गिक पाणी, मोटारपंप व इतर साधनांनी पाणी करीत रोवणी आटोपली. मात्र पाण्याअभावी रोवणी काळवंडाला लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येऊ लागले आहे. एवढेच नाही तर रोवण्यासाठी तयार असलेले पऱ्हे सुकायला लागली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण धानपट्ट्या जवळपास अशीच स्थिती दिसून येत आहे.
नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, पोंभूर्णा व चिमूर तालुक्यात धानाचे पीक घेतल्या जाते. या पिकावरच या तालुक्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. हे पीक घेण्यासाठी साधारणत: जूनच्या १५ तारखेनंतर आणि जुलै महिन्याच्या १० तारखेपर्यंत धानाचे आवते आणि पऱ्हेटाकले जातात. पऱ्हे१५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्यांची रोवणी करण्यात येते.यावर्षीच्या हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आवते आणि पऱ्हे नियोजित वेळेतच भरले. पण अगदी हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाने आपला लहरीपणा दाखविला . जून व जुलै या संपलेल्या पावसाच्या दोन महिन्यात एकही मोठा पाऊस या धानपट्ट्यातील तालुक्यांत पडला नाही. काही शेतकऱ्यांनी मोटर आणि इंजिनच्या पाण्यावर रोवणी केली. नागभीड, सिंदेवाही व ब्रह्मपुरी या तालुक्यांचे कृषी विभागाचे उपविभागीय कार्यालय नागभीड येथे आहे. उपविभागीय अधिकारी डी. एम. तापसकर यांना विचारणा केली असता या तिन्ही तालुक्यात अद्याप ३० ते ३२ टक्के रोवणी बाकी असल्याची माहिती त्यांनी दिली.
४० टक्के शेतकऱ्यांनी काढला विमा
नागभीड उपविभागातील नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी या तालुक्यात ७८ हजार शेतकरी आहेत. या ७८ हजार शेतकºयांपैकी ३८ ते ४० हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घेतला आहे. मुदतवाढ मिळाली तर आणखी यात वाढ होण्याची शक्यता आहे.
खत उपलब्ध, पण टाकू शकत नाही
सद्यस्थितीत कृषी केंद्रांमध्ये खत उपलब्ध आहे. मात्र रोज कडक आणि जीवघेणे उन्ह पडत असल्याने शेतकरी रोवणी केलेल्या धानास खताची मात्रा देण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. खताची मात्रा दिली आणि पाऊस आलाच नाही तर आधीच काळवंडत चाललेले धान पुन्हा काळवंडेल अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.