रंगीबेरंगी साड्यांनी नटले शेतशिवार; वन्यप्राण्यांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:05 AM2020-01-09T11:05:46+5:302020-01-09T11:06:07+5:30
राजुरा तालु्क्यातील काही शेतकऱ्यांनी नवी युक्ती शोधली असून शेतीला चक्क साड्यांचे कुंपण करून पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वातावरणात सातत्याने होणारे बदल, तापमानाचा घसरत जाणारा पारा आणि गडद धुके हे सर्व असतानाच वन्यप्राण्यांपासून शेताची होणारी नासधूस यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे शेतातील पीक वाचविण्यासाठी विविध प्रयोग करीत आहेत. असाच प्रयोग जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी केला असून रंगीबेरंगी साड्यांनी शेतशिवार सजवले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची पीक वाचविण्याची धडपड बघायला मिळत आहे.
महिनाभरापासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधीअवकाळी पाऊस तर कधी ढगाळी वातावरण यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. त्यातच औषध फवारणीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अडचणीत आणखीनच भर पडली आहे. कापूस, सोयाबिन, हरभरा उत्पादक ढगाळ वातावरणामुळे चिंतेत सापडले आहेत. मागील काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती असल्याने जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यातच चार दिवसापूर्वी पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे धुक्याची दाट चादर पसरत आहे. हे सर्व संकट असतानाच वन्यप्राण्यांमुळेही शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील राजुरा तालु्क्यातील काही शेतकऱ्यांनी नवी युक्ती शोधली असून हरभरा तसेच गहु पिकाच्या संरक्षमासाठी शेतीला चक्क साड्यांचे कुंपण करून पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
वातावरण बदलाचा शेतकऱ्यांना फटका
यंदा पर्जन्यमान समाधानकारक असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हरभरा, गहू या पिकांचे लागवड केली. मात्र वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि वातावरणातील बदलामुळे ते त्रस्त झाले आहे. शेतकरी शेती जगविण्यासाठी फवारणीसाठी मोठा खर्च करीत आहेत. सातत्याने वातावरणात बदल होत असला तरी मोठ्या मेहनतीने यंदा औषध फवारणी करुन पिके जगविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, हवामान खात्याने आणखी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की, काय अशी भीती शेतकऱ्यांना आहे.