शेतमजुराचा विजेच्या शाॅकने मृत्यू, बेलगाव येथील घटना
By साईनाथ कुचनकार | Published: July 16, 2023 08:55 PM2023-07-16T20:55:39+5:302023-07-16T20:55:46+5:30
शेतमालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाला घेराव
भद्रावती : तालुक्यातील बेलगाव येथे शेतावर काम करणाऱ्या मजुराचा फवारणी पंपाला चार्जिंग लावताना विजेचा शाॅक लागून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली; परंतु, हा घातपाताचा प्रकार असल्याने शेतमालकावर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी नातेवाईकांसह गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाला घेराव घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वप्निल सुहास रासेकर (२६, रा. बेलगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. तर विनोद ठेंगणे राहणार भद्रावती असे शेतमालकाचे नाव आहे. स्वप्निल मागील चार वर्षांपासून ठेंगणे यांच्याकडे शेतमजुरीचे काम करतो. घटनेच्या दिवशी ठेंगणे यांच्या बेलगाव येथील घरी स्वप्निल फवारणी पंपाला चार्जिंग लावत असताना त्याचा खुल्या तारांना स्पर्श झाला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.
बेलगाव येथे पोलिस पोहाेचल्यानंतर या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथे आणला. मात्र, कुटुंबीयांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. शेतमालक ठेंगणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, यासाठी नातेवाईकांसह गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाला घेराव घातला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.