रात्री पिकाला पाणी देणे बेतले शेतकऱ्याच्या जीवावर; चंद्रपूर जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:38 PM2018-11-02T12:38:30+5:302018-11-02T12:39:01+5:30
वरोरा तालुक्यातील महालगाव येथील शेतकरी वसंता नामदेव जांभुळे (३४) या शेतकऱ्याचा शुक्रवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास आपल्या शेतामध्ये पिकांना पाणी देताना विद्युत प्रवाहाचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील महालगाव येथील शेतकरी वसंता नामदेव जांभुळे (३४) या शेतकऱ्याचा शुक्रवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास आपल्या शेतामध्ये पिकांना पाणी देताना विद्युत प्रवाहाचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.
सदर शेतकऱ्याचा मृतदेह विच्छेदन करण्याकरिता वरोरा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन महावीतरणचे मुख्यकार्यकारी अभियंता प्रशांत राठी व ऊर्जामंंत्री बावनकुळे यांचाविरुद्ध ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन होऊ न देण्याची भूमिका शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी वरोरा-भद्रावती मतदार संघाचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा द्यावा या मागणीसाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला होता. विविध पक्षांनी आंदोलन सुद्धा केले होते. त्यानंतर अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महावितरण यांनी परिपत्रक काढून दि.१ नोव्हेंबरपासून दिवसा ३ फेज वीजपुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र वरोरा महावितरणने या परिपत्रकाला केराची टोपली दाखवून दिवसा ३ फेज वीजपुरवठा बंद करून रात्रीला वीजपुरवठा चालू ठेवला होता. त्यामुळे संबंधित शेतकरी आपल्या शेतातील पिकाला ओलित करण्याकरिता रात्री गेला असता त्याला नाहक आपला जीव गमवावा लागला आहे.
मृत्यू शेतकऱ्याचे वडिल ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महावितरण वरोराचे मुख्यकार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांच्या विरोधात वरोरा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेले होते.