वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; मुल तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 12:15 PM2022-06-11T12:15:38+5:302022-06-11T12:22:29+5:30
शेतकरी प्रमोद झुंगाजी मोहुर्ले हे शेतात हंगामपूर्व मशागतीचे काम करण्यासाठी गेले होते. काम करीत असताना तिथेच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.
मूल (चंद्रपूर) : शेतात मशीगतीचे काम करीत असताना अचानक पट्टेदार वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला. यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
प्रमोद झुंगाजी मोहुर्ले (४७), रा. पडझरी असे मृतकाचे नाव आहे. मूल वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या पडझरी येथील शेतकरी प्रमोद झुंगाजी मोहुर्ले हे शुक्रवारी सकाळी शेतात हंगामपूर्व मशागतीचे काम करण्यासाठी गेले होते. काम करीत असताना तिथेच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.
आजूबाजूला त्यावेळी कोणीच नसल्याने प्रमोदची वाघाच्या तावडीतून सुटका होऊ शकली नाही. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर याची माहिती इतर शेतकऱ्यांना झाली. त्यांनी लगेच वन विभागाला माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. मृतक प्रमोद यांच्या मागे पत्नी व दोन मुले असून, त्यांच्या नावे पडझरी येथे शेती आहे.