जंगलात सरपण गोळा करताना वाघाचा हल्ला; शेतकरी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2022 11:47 AM2022-12-08T11:47:34+5:302022-12-08T11:48:52+5:30
सावली तालुक्यातील नीलसनी पेठगाव येथील घटना
सावली (चंद्रपूर) : सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना तालुक्यातील सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र सामदा, कक्ष क्र. २०१ मध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली व बुधवारी उघडकीस आली.
कैलास लक्ष्मण गेडेकर (४७, रा. नीलसनी पेठगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील बहुतांश परिसर हा जंगलव्याप्त आहे. या परिसरात हिंस्र पशूंचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. कैलास गेडेकर हे सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र सामदा, कक्ष क्र. २०१ मध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी शोध घेतला.
आप्त नातेवाइकांकडे चौकशी केली. कुठेच पत्ता लागला नाही. बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांनी जंगलात शोध घेतला असता कैलासचा मृतदेह आढळून आला. शेतालगत असलेल्या झुडपी जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने कैलासवर हल्ला करून ठार केले व मृतदेह जंगलात फरफटत नेला असल्याचे पंचनाम्यादरम्यान निष्पन्न झाले.
दोन दिवसांपूर्वी जुळले होते मुलीचे लग्न
दोन दिवसांपूर्वीच कैलास गेडेकर यांच्या मुलीचे लग्न जुळले होते. घरातील कर्ता पुरुषच गेल्याने कुटुंबावर आघात झाला आहे. सावली वनविभागाने मृतदेहाचा पंचनामा केला. मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे. वनविभागाकडून मृतकाच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपयांची तत्काळ मदत देण्यात आली असून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरूटकर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रसहायक सूर्यवंशी, वनरक्षक सोनेकर करीत आहेत.