अपार मेहनत आणि जिद्दीच्या बळावर फुलविली झेंडूची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:51 AM2018-11-13T11:51:38+5:302018-11-13T11:52:29+5:30
यशकथा : राजुरा तालुक्यातल्या गोवरी येथील रामदास बोथले या प्रगतिशील शेतकऱ्याने अपार मेहनत व प्रचंड जिद्दीच्या बळावर काळ्या कसदार मातीत झेंडूची शेती करीत शेतात पिवळे रान फुलविले आहे.
- प्रकाश काळे (गोवरी, जि. चंद्रपूर)
शेतीला आज कुणाचीच साथ उरली नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रावरच अवकळा आली आहे. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही. काळ्या कसदार मातीत सोन्यासारखा शेतमाल पिकवूनही त्याला साजेसा दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली असतानाच जे चांगल्या दराने बाजारात विकले जाते तेच आता शेतात पिकविले पाहिजे, या उदात्त हेतूने झपाटलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या गोवरी येथील रामदास बोथले या प्रगतिशील शेतकऱ्याने अपार मेहनत व प्रचंड जिद्दीच्या बळावर काळ्या कसदार मातीत झेंडूची शेती करीत शेतात पिवळे रान फुलविले आहे.
शेतकऱ्यांना निसर्ग साथ देत नाही. शेतकऱ्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरविणाराही कुणी उरला नाही. कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती अगदी वाईट आहे. त्यामुळे हतबल झालेला राजुरा तालुक्याच्या गोवरी येथील प्रगतिशील शेतकरी रामदास बोथले यांनी आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत झेंडूच्या फुलांची शेती केली. त्यांनी आपल्या एकरभर शेतात ५ हजार झेंडूच्या फुलांची रोपे लावली. झेंडूच्या फुलांना बाजारात चांगली मागणी असल्याने त्यांनी झेंडूची शेती करण्याचा निर्णय घेतला. नागपूर येथून त्यांनी झेंडूच्या फुलांचे बीज आणून त्याची लागवड केली आहे.आजघडीला झेंडूच्या फुलांची एक एकरातील शेती चांगलीच बहरली आहे. दिवाळी व सणासुदीच्या दिवसात ७० ते ८० रुपये किलोप्रमाणे झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळत असल्याचे शेतकरी रामदास बोथले यांचे म्हणणे आहे.
रामदास बोथले यांची राजुरा-पोवनी मार्गावर गोवरी येथे मुख्य मार्गालगत ३ एकर शेती आहे. त्यापैकी एका एकर शेतीत झेंडूची फुले, तर दोन एकर शेतात ते भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. दरवर्षी रामदास बोथले हे ३ एकर शेतात कपासीचे उत्पादन घ्यायचे; मात्र कपासीवर मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा. त्या तुलनेत उत्पादन कमी व्हायचे. कापसाला दर अल्प असल्याने कापसाची शेती परवडत नव्हती. त्यामुळे ते हताश झाले होते. दिवस-रात्र शेतात काबाडकष्ट करूनही हाती काहीच शिल्लक उरत नाही. केलेली मेहनत वाया जाते. केलेला खर्च भरून निघत नसल्याने त्यांनी आधुनिक शेतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत झेंडूची शेती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
नापिकीने हतबल झालेल्या शेतकऱ्याने अपार मेहनत व जिद्दीच्या जोरावर झेंडूची शेती करीत शेतकऱ्यांना शेतातील नवी वाट चोखाळायला लावणारी नवी उमेद या प्रगतिशील शेतकऱ्याने दिली. परिस्थितीला शरण न जाता संकटावर मात करून प्रचंड जिद्दीच्या बळावर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श घालून दिला आहे. बाजारात चांगल्या दराने जे विकले जाते तेच आता शेतकऱ्यांनी पिकविले पाहिजे. असा मानस रामदास बोथले या शेतकऱ्याने व्यक्त केला आहे.