शेतकऱ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:27 AM2020-12-29T04:27:31+5:302020-12-29T04:27:31+5:30
शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे चंद्रपूर : मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतीतंत्रज्ञानाचे प्रशिक्षण ...
शेतकऱ्यांना
प्रशिक्षण द्यावे
चंद्रपूर : मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतीतंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देवून त्यांचा आर्थिक स्त्रोत वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देवून तालुकानिहाय प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
नेटवर्कअभावी
ग्राहक त्रस्त
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावात तसेच दुर्गम भागामध्ये विविध कंपन्यांसह बीएसएनएलचेसुद्धा नेटवर्क नाही. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहे. त्यातच ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नेटवर्क समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.
गावांना रस्त्याची प्रतीक्षा
वरोरा : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागते. अनेक गावात जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. अनेकदा रस्ते तयार करण्याची मागणी करण्यात आली. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
शेतकामामुळे
गावातील कट्टे थंडावले
चंद्रपूर : सध्या शेतामध्ये कापूस वेचनी, सोयाबीन तसेच धान काढणीचे काम सुरु आहे. त्यामुळे गावातील पारावर तसेच चौकाचौकात बसून गप्पा करणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. इतरवेळी सायंकाळी तसेच सकाळी चर्चा करण्यासाठी येणारे नागरिक आता शेतातून ढकून येत असल्याने घरीच आराम करणे पसंत करीत आहे.
रस्ता दुरुस्तीची शेतकऱ्यांची मागणी
घोडपेठ : कुडरारा ते चिरादेवी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे. रस्त्याअभावी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बेरोजगारांच्या
हाताला काम द्या
चंद्रपूर: जिल्ह्यात मोठ्या संख्येने सुशिक्षीत बेरोजगार असून त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते नैराश्यात सापडले आहे.त्यामुळे या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी तसेच जिल्ह्यात अधिकधिक उद्योगाची निर्मिती करावी, अशी मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे.
ग्राम पंचायत निवडणुकीकडे लक्ष
चंद्रपूर: काही ग्रामपंचायतीचा कालावधी मागील महिन्यात संपला आहे. त्यामुळे येथे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्रामीण नागरिकांचे निवडणुकीकडे लक्ष लागले असून इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे.
अतिवृष्टीचा निधी मिळाला नाही
चंद्रपूर : शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टीची मदत अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी पटवारी आणि तहसील कार्यालयात चकरा वाढल्या आहेत. काही दिवसात नुकसान भरपाई मिळेल, असे आश्वासन देवून अधिकारी मोकळे होत आहे. त्यामुळे शेतकर्त्रऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
थंडी वाढली
चंद्रपूर : मागील दोन दिवसापासून जिल्ल्डह्यात थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे पहाटे फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही नागरिक मार्निंग वॉकसाठी शहराबाहेरील रस्त्यावर मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे.
गडचांदूर - वणोजा- वणी बससेवा सुरू करा
गडचांदूर : येथून वणोजा मार्गे वणी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. ही बस सेवा सुरू झाल्यास नांदा, बिबी, अवारपूर, अंतरगाव, सांगोडा, सिंदोला, कळमना गावातील नागरिकांना सोयीचे होणार आहे.
तंटामुक्त समित्यांना सक्रिय करा
चंद्रपूर : तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी गावातील तंटे गावात सोडविण्यासाठी गावागावांत तंटामुक्त समितीची स्थापना केली. पूर्वी या समितीला चांगले दिवस होते. मात्र आता या समित्या थंडबस्त्यात आहे. दरम्यान, लाॅकडाऊनच्या काळात काही समित्यांनी चांगले काम केले आहे. आता पुन्हा या समित्यांना सक्रीय करण्याची मागणी केली जात आहे.
फळांची मागणी वाढली
चंद्रपूर : रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विटामिन सीयुक्त फळे खायला नागरिक पसंती देत आहेत. दरम्यान, सध्या बाजारपेठेत फळे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी बघायला मिळत आहे. कोरोनाची दहशत असल्याने बाजरात फळांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे.
तालुका क्रीडा संकुलाची दुरवस्था
कोरपना : येथील तालुका क्रीडा संकुलाची देखभालीअभावी दुरावस्था झाली आहे. संकुलाच्या निर्मितीपासून तेथे वीज पुरवठ्याची व्यवस्था नाही. तसेच इमारत भग्नावस्थेत पडली असून बास्केटबॉल कोर्टवर बाॅस्केट बॉल लावण्यात आले नाही. क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत.
सुसज्ज बाजार ओट्याची निर्मिती
कोरपना : शहरातील आठवडी बाजार परिसरात नवीन सुसज्ज बाजार ओट्यांची निर्मिती करण्यात आली आहे. परिणामी भाजी विक्रेत्यांना चांगली सोय निर्माण झाली आहे. तसेच बाजार करणे सुविधाजनक झाले आहे. नवीन ओट्यावर छत असल्याने पाऊस व उन्हापासून बचाव होत असल्याची प्रतिक्रीया ग्राहक व्यक्त करीत आहेत.
बैलबंडीने रेतीची वाहतूक करु द्यावी
चंद्रपूर : रेतीघाटांचे लिलाव झाले नसल्याने रेती उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे बैलबंडीने रेतीची वाहतूक करणाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे बैलबंडीने वाळू वाहतूक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.