वन्य प्राण्यांच्या दहशतीत शेतकरी व पशुधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:32 AM2021-08-21T04:32:34+5:302021-08-21T04:32:34+5:30

नागभीड : नागभीड तालुक्यात मानव-वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष बराच आहे. तालुक्यातील पशुधन आणि शेतकरी जंगली प्राण्यांच्या दहशतीत आहेत. ...

Farmers and livestock in fear of wild animals | वन्य प्राण्यांच्या दहशतीत शेतकरी व पशुधन

वन्य प्राण्यांच्या दहशतीत शेतकरी व पशुधन

Next

नागभीड : नागभीड तालुक्यात मानव-वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष बराच आहे. तालुक्यातील पशुधन आणि शेतकरी जंगली प्राण्यांच्या दहशतीत आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या ४२ घटना नागभीड वनपरिक्षेत्रातच घडल्या आहेत. तळोधी वनपरिक्षेत्राची आकडेवारी वेगळीच आहे.

नागभीड तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ५१ हजार ६६०.४५ हेक्टरमध्ये विस्तारले आहे. यापैकी १४ हजार २९७.२५ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे. तालुक्यातील जंगलक्षेत्र लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी तळोधी (बाळापूर) येथे स्वतंत्र वनपरिक्षेत्र कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. तालुक्यातील गोविंदपूर, कचेपार, गिरगाव, सोनापूर, वाढोणा, गंगासागर हेटी, जनकापूर, बाळापूर, देवपायली, बोंड, मिंडाळा, कोसंबी गवळी, नवेगाव हुंडेश्वरी, मौशी, ढोरपा, बालापूर खुर्द, पाहार्णी, म्हसली, कोरंबी, डोंगरगाव, नवखळा आदी परिसर, तर चांगलाच जंगलव्याप्त आहे. या जंगल परिसरात अनेकदा लोकांना वाघ, बिबट व अन्य जंगली प्राण्यांचे दिवसाढवळ्या दर्शन झाले आहे.

उल्लेखनीय बाब ही की, या व याशिवाय अन्य अनेक गावांतील शेतकऱ्यांची शेती या जंगलाला लागून आहे. शेती आणि पशुधनाच्या निमित्ताने या गावांचा आणि शेतकऱ्यांचा रोजच जंगलाशी संबंध येतो. यातूनच वन्यप्राणी शेतकरी आणि पशुधनावर हल्ले करीत आहेत.

बॉक्स

आतापर्यंत असे झाले हल्ले

नागभीड वनपरिक्षेत्रात एप्रिल महिन्यापासून १४ व्यक्तींवर रानटी डुकरांनी हल्ले केले आहेत. दोन व्यक्तींवर बिबट्यांनी, तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २६ जनावरे जखमी व मृत्युमुखी पडली असल्याची माहिती आहे. या घटना केवळ घटनाच नाही तर या घटनांचा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. दहशतीमुळे शेतकऱ्यांचे शेतीकडे दुर्लक्ष होते. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पशुधन मृत्युमुखी पडत असल्याने किंवा जखमी होत असल्याने त्या शेतकऱ्याचा त्याचा जो रोजचा व्यवहार आहे तो थांबत असतो. हे होऊ नये यासाठी शासनाने उपाययोजना करायला हव्यात.

बॉक्स

तळोधी वनपरिक्षेत्र संवेदनशील

नागभीड वनपरिक्षेत्राच्या तुलनेत तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्र अतिशय संवेदनशील आहे. गेल्या चार महिन्यांत या वनपरिक्षेत्रात वाघाने थेट व्यक्तींवर हल्ला करून ठार केल्याच्या चार घटना आहेत. यात कोजबी माल येथील सरपणासाठी गेलेली व्यक्ती, मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेलेली महिला आणि आकापूर व वाढोणा येथील दोन गुराख्यांचा समावेश आहे. या वनपरिक्षेत्रातही अन्य वन्य प्राण्यांकडून पशुधनावर, व्यक्तींवर हल्ला करून ठार किंवा जखमी केल्याच्या अनेक घटना आहेत. मात्र, या घटनांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही.

Web Title: Farmers and livestock in fear of wild animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.