खत बोगस आहे... खोटं वाटत असन तं खाऊन दाखवतो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 03:18 PM2021-09-24T15:18:55+5:302021-09-24T15:21:55+5:30
शंकरपूर येथील दत्त कृषी केंद्रातून बोगस खताची विक्री केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसमक्ष दत्त कृषी केंद्राची चौकशी केली. दरम्यान, खताच्या नावाखाली चुना आणि मातीचे मिश्रण विकले जात असल्याचे सांगत काही शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसमोर हे खत खाऊन दाखवले.
अमोद गौरकार
चंद्रपूर : शंकरपूर येथील दत्त कृषी केंद्रातून बोगस खताची विक्री केल्याच्या तक्रारी जिल्हा कृषी अधिकारी व इतर कार्यालयात करण्यात आल्या आहेत. त्यानंतर गुरुवारी चंद्रपूर येथील कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसमक्ष दत्त कृषी केंद्राची चौकशी केली असून, येथील खताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. विशेष म्हणजे, खताच्या नावाखाली चुना आणि मातीचे मिश्रण विकले जात असल्याचे सांगत काही संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसमोर हे खत खाऊन दाखवले.
यावेळी शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या शिल्लक खतासोबत बिल पावती दत्त कृषी केंद्रामध्ये आणायला लावली. त्या खतांचेही नमुने घेऊन तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. या कार्यवाहीची एक प्रत शेतकऱ्यांकडेही देण्यात आली आहे. यावेळी चौकशी करताना तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे उपस्थित होते, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचायत समितीचे कृषी अधिकारी सहारे यांना उपस्थित राहण्याकरिता सूचना केली. मात्र, ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध रोष व्यक्त केला.
कृषी केंद्रातील गडबडी
काही शेतकऱ्यांना कृषी संचालक राजू वैद्य यांनी कच्चे बिल दिले तर काही शेतकऱ्यांना पक्के बिल दिल्याचे यावेळी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्या नंबरचे बिल बुक तपासले असता, त्या क्रमांकाची डुप्लिकेट बिले फाडल्याचे निदर्शनास आले. खताच्या बॅगचे वजन केले असता, ती बॅग आठ किलोने कमी असल्याने हे खत कंपनीचे नसून कुठेतरी पॅकिंग केले असावे, असे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. या खतामध्ये कोणतेही रासायनिक द्रव्य नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर हे खत खाऊन दाखवले. त्यामध्ये चुना आणि मातीचे मिश्रण असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते.
मी शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे असलेल्या खताचे नमुने याठिकाणी घेतले असून, कृषी महाविद्यालय, अमरावती येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले आहेत. खतांच्या नमुन्यांचा अहवाल आल्यावर अहवालाची प्रत शेतकऱ्यांना देण्यात येईल व योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- प्रशांत मडावी
जिल्हा कृषी पर्यवेक्षक, चंद्रपूर