शेतमजूर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:33 AM2021-01-08T05:33:31+5:302021-01-08T05:33:31+5:30
चंद्रपूर : निसर्गाचा लहरीपणा, बी-बियाणांचे वाढलेले दर यामुळे दिवसेंदिवस शेती करणे कठीण जात आहे. त्यातच आता मजूर? मिळत नसल्याची ...
चंद्रपूर : निसर्गाचा लहरीपणा, बी-बियाणांचे वाढलेले दर यामुळे दिवसेंदिवस शेती करणे कठीण जात आहे. त्यातच आता मजूर? मिळत नसल्याची भर पडली आहे. यंत्राच्या माध्यमातून शेती केली जात असली तरी काही कामांसाठी मजुराची गरज असते. मजुरी वाढवूनही मजूर? शेतकामाला येत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहे. त्यामुळे मजूर? देता का मजूर?, अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये धान उत्पादनासह, सोयाबीन, कापूस, तूर, गहू, चना, आदी पिके घेतली जाते. मात्र, शेतकामापेक्षा इतर कामे बरे म्हणून मजूर शेतीच्या कामास येण्यास नकार देत असल्याचे चित्र मागील काही वर्षांपासून बघायला मिळत आहे. सध्या पुरुष शेतमजुराला ३०० ते ३५० रुपये, तसेच फवारणी, जड कामासाठी ४०० रुपये मोजावे लागत आहे, तर महिला मजुरांना १५० रुपयांपर्यंत मजुरी आहे. हंगामाच्या दिवसांमध्ये मजुरांची टंचाई असते. अशावेळी यामध्ये वाढ होत आहे. विशेषत: धान, सोयाबीन, गहू, आदी काढणीच्या कामामध्ये मजूर गुत्ता पद्धतीने कामे घेतात. यामध्ये ते यापेक्षाही अधिक मजुरी पाडतात. या सर्वांमध्ये कापूस वेचनीच्या कामामध्ये अंगावरचे काम असल्यामुळे मजूर अधिक मजुरी पाडतात. मागील वर्षापर्यंत कापूस वेचनीत किलोमागे पाच रुपये मोजावे लागत होते. मात्र, यावर्षी बोंडअळीमुळे कापूस वेचणीच होत नसल्याने १० रुपये किलो देऊनही मजूर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेती करणे दिवसेंदिवस कठीण १. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यातच हंगामानुसारच हाताला काम मिळते. त्यामुळे शेतकामाची मजुरी वाढणे गरजेचे आहे. मजुरी जास्त पडावी यासाठी गुत्ता पद्धतीने काम केल्यास अधिक मजुरी पडते. मात्र, अतिरिक्त काम करावे लागत असल्याचे गोवरी येथी प्रदीप लोहे म्हणाले.
२. धान उत्पादक क्षेत्रामध्ये धान रोवणी, तसेच कापणी झाल्यानंतर हाताला काम नसते. त्यामुळे या काळात कमावून वर्षभर पैसा पुरवावा लागतो. दिवसभर राबूनही हातात १५० ते २०० रुपये पडते.
मिंथुर येथील देविदास काटवले यांचे म्हणणे आहे.
३. यांत्रिकीपद्धतीने शेती केली जात असली तरी मजुरांची गरज असतेच. बी-बियाणे खते, रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहे. त्यातच मजूरही मिळत नाही. त्यामुळे पेरणी, तसेच काढणीच्या वेळी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा मजुरांअभावी पेरणी उशिरा होत असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम पडत असल्याचे कोरपना येथील शेतकरी अरुण जेनेकर यांचे म्हणणे आहे.
मजुरीचा दर
पाच वर्षांपूर्वी
पुरुष मजूर २०० रुपये
महिला मजूर १०० रुपये
यावर्षीचे दर
पुरुष मजूर ३५० रुपये
महिला मजूर १५० रुपये
यंत्राद्वारे होणारी कामे
वखरणी, नांगरणी, डवरणी, पेरणी, मळणी, कापणी, तण काढणी, पाट काढणे, गादी वाफा, फवारणी
--
कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा
मागील काही वर्षांमध्ये मजुरांची जागा कृषी यंत्रांनी घेतली आहे. बहुतांश कामे यंत्रांद्वारे केली जात आहे. पूर्वी ज्या कामासाठी आठ ते दहा मजूर लागायचे त्याच कामासाठी आता दोन ते तीन मजूर लागत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या पैशाची बचत, तसेच काम अधिक वेगाने होत आहे.