कर्जाचे ओझे घेऊन शेतकरी नव्या हंगामासाठी सज्ज
By admin | Published: June 4, 2016 12:52 AM2016-06-04T00:52:11+5:302016-06-04T00:52:11+5:30
डोक्यावर कर्ज आहे म्हणून रडायचे नसते. काळ्या मातीची सेवा सोडायची नसते. निसर्ग कितीही कोपला तरीही
कर्ज पुनर्गठनाची प्रतीक्षा : पेरणीसाठी बियाणांची जुळवाजुळव
सावली : डोक्यावर कर्ज आहे म्हणून रडायचे नसते. काळ्या मातीची सेवा सोडायची नसते. निसर्ग कितीही कोपला तरीही एक दिवस सोनेरी पहाट उगवेल या आशेने कितीही दुष्काळ पडला तरी धान उत्पादक शेतकरी दरवर्षी नव्या हंगामासाठी तयार असतो. सध्या पेरणीपूर्व हंगाम सुरू असून भर उन्हात शेतात काम सुरू आहेत.
अल्प पावसामुळे मागील वर्षी धानाचे उत्पादन अतिशय कमी झाले होते. बियाण्यांचा दर्जाही घसरला होता. त्यामुळे या हंगामात नविन बि-बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
कृषी केंद्रात नवनवीन कंपन्यांचे बियाणे उपलब्ध झाले आहेत. महागडे बियाणे घेण्यासाठी पैशाची जुळवाजुळव सुरू आहे. काही शेतकरी इतर शेतकऱ्याकडून उसणवारीने बियाणे घेत आहेत.(शहर प्रतिनिधी)
गोसेखुर्दचे पाणी सोडण्याची मागणी
काही दिवसातच पऱ्हे लावण्याचा हंगाम सुरू होणार आहे. वेळेवर रोवणी झाली तर उत्पादन वाढू शकते. शेतकऱ्याला अधिकचे पैसे मिळू शकतात. त्यामुळे आतापासून आसोला तलावात पाणी सोडणे गरजेचे आहे. गराडी नाल्याचे काम पूर्ण न झाल्याने मागील वर्षी पाईपने पाणी टाकण्यात आले. पाणी उशिरा आल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. पाईपमधून पाणी दिल्यास चार महिने तलाव भरण्यासाठी लागतात. त्यामुळे आतापासून पाणी सोडणे हितकारक ठरणार आहे. तसेच पावसाचे पाणीसुद्धा तलावात जमा होईल. साहजिकच आसोला तलाव भरण्यास वेळ लागणार नाही. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा अगोदरच नियोजन करणे गरजेचे आहे. या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनीसुद्धा आढावा बैठकीत पाणी समस्या सोडण्याबाबत सकारात्मक उत्तरे दिलीत.
२०१२ पासूनचे कर्ज पुनर्गठनाची मागणी
सरकारने २०१२-१३, २०१३-१४, २०१४-१५ चे कर्ज पुनगर्ठन करण्याचे आदेश दिले. पण सरकारी बँका, सेवा सहकारी संस्था २०१५ चे कर्ज पुनर्गठनला प्राधान्य देत असल्याने २०१२ पासूनचे थकीत शेतकऱ्यांना वाट बघावी लागत आहे. यावर्षी दुष्काळी मदत, पीक विमा न मिळाल्याने जिल्ह्यातील कास्तकार हवालदिल झाला आहे. त्यामुळे नविन हंगामासाठी थकीत कर्जधारक शेतकऱ्यांनासुद्धा सरसकट कर्ज देण्याची मागणी जोर धरत आहे.
रोजगार हमीने दिला आधार
सावली नगरपंचायत झाल्याने यावर्षी सावलीतील मजुरांना कामे मिळाले नाही पण इतर गावात मोठ्या प्रमाणात पांदण रस्ते रोजगार हमीचे कामे झाल्याने दुष्काळग्रस्त शेतकरी, मजुर यांना रोजगार मिळाला. या कामातून पावसाळ्याची थोडी व्यवस्था मजूर वर्गाची झाली आहे. उन्हाळी धानपिकामुळे पाथरी गावातील शेतकरी, मजुरांना आधार मिळाला.