साहेब, किमान नुकसानीचे पंचनामे तरी करा हो...!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 12:27 PM2024-09-06T12:27:00+5:302024-09-06T12:27:27+5:30
वर्धा नदीला दुसऱ्यांदा पूर : शेती उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल
राजेश माहूरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : दोन दिवसांपूर्वी वर्धा नदीला आलेल्या पुराने बळीराजा पुरता खचला आहे. शेतकऱ्याने पहिल्यांदा पेरणी केली. ती बिनकामाची ठरली. नव्या उमेदीने दुसऱ्यांदा पेरणी केली आणि पुराने संपूर्ण शेतीच पाण्याखाली आली. पदरमोड करून, खासगी कर्ज उसनवारी करून कसातरी मार्ग काढून शेतीत पुन्हा पिके लावली. मात्र दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे पुन्हा पिके पाण्याखाली आली. यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे.
यापूर्वीच्या पूरस्थितीत अनेकांचे पंचनामे झाले. मोठ्या घोषणा झाल्या. पण मदत मात्र प्रत्यक्षात मिळाली नाही. आपल्या शेतीला जिवंत ठेवण्यासाठी पूर्ण जीव ओतणारा बळीराजा मात्र उपेक्षितच आहे. शेतकऱ्यांची फार मोठी अपेक्षाही नाही. किमान नुकसानीचे पंचनामे तरी करा हेच त्यांचे म्हणणे आहे. पण सरकार व काही अधिकारी याकडे लक्षच द्यायला तयार नाहीत. मतांचे राजकारण करण्यासाठी सर्वच पक्ष बहिणींना लाडकी म्हणताहेत. पण गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील एका शेतकरी बहिणीने आपली व्यथा जाहीर करीत या सरकारचा व प्रशासनाचा बुरखाच फाडला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील विद्या चौधरी या महिला शेतकऱ्याने आता टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. एका व्हिडीओतून त्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत आमची शेतातली मिरची ही पाण्याखाली आली असून लाखोंचे नुकसान झाले. किमान नुकसानीचे पंचनामे व्हावे, अशी मागणी केली आहे. वर्धा नदीला पूर आल्याने तोहगाव कुडेसावलीसह, परसोडी, लाठी, अडेगाव, नंदवर्धन, पानोरा, आर्वी अशा अनेक नदीकाठी असणाऱ्या गावांना फटका बसला आहे.
पहिल्यांदा कापूस शेतात लावल्यानंतर धान पेरणी केल्यानंतर वर्धा नदीला मोठा पूर आला. त्याच्यामुळे अनेकांच्या शेतीचे नुकसान झाले. नंतर काहींनी मिरचीची रोपे लावली होती आणि त्यांची लागवड आता आठवडाभरापूर्वी करण्यात आली. मात्र दोन दिवसांपूर्वी वर्धा नदीला पुन्हा पूर आल्याने ती मिरचीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे आता कंबरडेच मोडले आहे. यंदा शेती उद्ध्वस्त झाली असून एक रुपयाचेही पीक त्यांना घेता येणार नाही.
नुकसानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
तालुक्यातील अडेगाव येथील विद्या बालाजी चौधरी यांनी शेतीच्या नुकसानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत किमान प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करावे, अन्यथा आत्महत्येचा पर्याय निवडावा लागेल, अशी भावना व्यक्त केली
"नुकसानग्रस्तांचे पंचनाम्याचे आदेश पथक बनवून त्यांना दिले आहेत. पूर ओसरल्यानंतर पंचनामे सुरू होतील. व्हिडीओमधील महिलेचे मत ऐकले. विद्या बालाजी चौधरी ही व्हिडीओतील महिला कुसुमबाई वसंत चौधरी यांची सून आहे. पूर आला होता, तेव्हा शेतात सर्व्हे केला आहे. "
- शुभम बहाकर, तहसीलदार, गोंडपिपरी.