हमीभावासाठी शेतकऱ्यांच्या हल्लाबोल मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:08 PM2018-10-26T23:08:21+5:302018-10-26T23:08:49+5:30
व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सरकारी खरेदी करून शेतकऱ्यांचा माल हभीभावाप्रमाणे खरेदी करावा, या मागणीसाठी शुक्रवारी राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकऱ्यांनी हल्लाबोल करीत मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सरकारी खरेदी करून शेतकऱ्यांचा माल हभीभावाप्रमाणे खरेदी करावा, या मागणीसाठी शुक्रवारी राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकऱ्यांनी हल्लाबोल करीत मोर्चा काढला.
सदर मोर्चा किसान क्रांती समन्वय समितीच्या नेतृत्वात करण्यात काढण्यात आला. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी राजुराचे ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची खासगी व्यापारी अक्षरक्ष: लूट करीत आहे. सोयाबिनचा हमीभाव ३४५० रूपये असताना व्यापारी कमी दर देत आहेत. ही शेतकऱ्यांची पिळवणूक असून ती थांबविण्यासाठी हमीभावाप्रमाणे शेतमालाची खरेदी करावी, बाजार समितीने सरकारी खरेदी सुरू करावी, अशी मागणी किसान क्रांती समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी शेतकऱ्यांसोबत किसान क्रांती समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बोबडे, गणेश झाडे, मारोती कूरवटकर, बालाजी भोंगळे, प्रकाश ताजणे, बापुराव मडावी, सुनील मुसळे, भिवराज सोनी, संतोष दोरखंडे, अरविंद वांढरे, राजेश देवरवार, गौरव चाफले, ज्ञानेश आत्राम, महादेव चाफले, महेश धोगंडे उपस्थित होते. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती कवडू पोटे यांच्याशी चर्चा करून हमीभावाप्रमाणे शेतमाल खरेदी करण्याची मागणी केली.
मात्र, खासगी व्यापारी बाजार समितीमध्ये हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यास तयार नसलयाने सायंकाळपर्यंत शेतकरी तिथेच ठिय्या मांडून होते. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला सोयाबिन बाजार समितीच्या आवारात तसाच पडून होता. सकाळपासून आलेले शेतकरी शेतमाल विक्रीच्या प्रतीक्षेत होते. मात्र त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणीही सवड काढली नाही.
वृत्त लिहिपर्यंत यावर कोणताही तोडगा निघाला नव्हता.
अन् शेतकरी तहानेने व्याकुळले
शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासूनच शेतमाल विक्रीसाठी आणला होता. मात्र, बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने पिण्याच्या पाण्याची कोणतीच व्यवस्था केली नाही. त्यामुळे शेतकरी पाण्यासाठी इतरत्र भटकताना दिसत होते. त्यामुळेही शेतकरी संतप्त झाले.