लघुसिंचन कार्यालयाला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे
By admin | Published: June 23, 2017 12:33 AM2017-06-23T00:33:40+5:302017-06-23T00:33:40+5:30
तालुक्यातील डोंगर्ला येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी तलावाच्या बांधकामाकरिता सन २००३ मध्ये संपादित करण्यात आल्या.
१४ वर्षांपासून मोबदला नाही : अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : तालुक्यातील डोंगर्ला येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी तलावाच्या बांधकामाकरिता सन २००३ मध्ये संपादित करण्यात आल्या. मात्र तब्बल १४ वर्षांनंतरही या शेतकऱ्यांना तलावात गेलेल्या जमिनीचा मोबदला लघसिचंन विभागाने दिला नाही. त्यामुळे डोंगर्ला येथील संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी दीड वाजता लघु सिंचन कार्यालयाला कुलूप ठोकले.
चिमूरपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगर्ला येथे जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत लघु सिंचन विभागाकडून २००३ ला ३२ शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादीत केल्या व सन २००५ मध्ये तलावाचे बांधकामही पूर्ण झाले. मात्र मागील १४ वर्षापासून या शेतकऱ्यांना एक दमडीही मोबदला दिला नाही. तलावात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी कितीवेळा तरी धरणे आंदोलन, पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे गुरुवारला स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण जांभुळे यांच्या नेतृत्वात कुलूप ठोको आंदोलन करण्यात आले.
दरम्यान तालुकास्तरीय लघु सिंचन विभाग तसेच जिल्हा परिषद अंतर्गत कार्यकारी अभियंता यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कार्यवाहीची मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकरी संघटनेचे नारायण जांभुळे यांच्या नेतृत्वात लघु सिंचन विभाग पंचायत समिती या कार्यालयाला सांकेतीक ताला ठोको आंदोलन करुन चाबी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. आंदोलनात पीडित शेतकरी संजय जांभुळे, हरिचंद्र जांभुळे, यशवंत चौधरी, सुधाकर जांभुळे, विकास जांभुळे, विनोद जांभुळे, राजूब कुंभले, दिलीप गजभे, संतोष गजभे, बळीराम जांभुळे महादेव नन्नावरे, हरिदास जांभुळे, मोतीराम जांभुळे आदी शेतकरी सहभागी होते.