चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:25 AM2019-05-17T00:25:59+5:302019-05-17T00:26:17+5:30
एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यानंतर जिल्ह्यात सूर्याने आग ओकणे सुरू केले. सूर्याचा हा प्रकोप मे महिन्याच्या पंधरवाड्यापर्यंत कायमच आहे. पारा सतत ४५ अंशापार जात आहे. मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यामुळे गावशिवार व जंगललगातचा परिसर ओसाड पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यानंतर जिल्ह्यात सूर्याने आग ओकणे सुरू केले. सूर्याचा हा प्रकोप मे महिन्याच्या पंधरवाड्यापर्यंत कायमच आहे. पारा सतत ४५ अंशापार जात आहे. मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यामुळे गावशिवार व जंगललगातचा परिसर ओसाड पडला आहे. परिणामी जनावरांच्या चाऱ्यांची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना आपले पशुधन जगविण्यासाठी चारा दुकानातून विकत घ्यावा लागत आहे. यामुळे ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकºयांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. डिसेंबर महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला होता. फेब्रुवारी, मार्च महिन्यात तर स्थिती आणखी बिकट झाली होती. नलेश्वर, चंदई, लभानसराड यासह आणखी दोन प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. नदी, नाले, तलाव, बोड्या हे ग्रामीण भागातील जलस्रोत चिंताजनक स्थितीत आले आहे. पाण्याची स्थिती नाजुकच आहे. ग्रामीण भागातील जलस्रोत आटले आहेत. नदी-नाल्यांसोबतच नागरिकांच्या घरातील विहिरी, बोअरवेल यांचेही पाणी कमी झाले आहे. एकूणच पाण्याची पातळीच खोल गेल्याने याचा सर्व जलस्रोतांवर परिणाम झाला आहे. जिवती, कोरपना तालुक्यातील परिसर पहाडी भाग आहे. या परिसरातील अनेक गावात पाणी नाही. आदिवासींचे गुडे पाण्याविना टाहो फोडत आहे. जिवती, कोरपना, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, भद्रावती, वरोरा, गोंडपिपरी, पोंभूर्णा, सिंदेवाही यासह जवळजवळ संपूर्ण तालुक्यातच जलसाठ्यांची स्थिती भयावह आहे.
जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने भूईला भेगा पडू लागल्या आहे. त्यामुळे जमिनीवर गवत व इतर तृण नाही. परिणामी गावशिवारात व जंगलालगतच कुठेही जनावरांचा चारा दिसून येत नाही. शेतकरी आपल्या जनावरांना शेतशिवारात किंवा जंगलालगतच्या परिसरात, जिथे पाण्याचे स्रोत आहे, तिथे चराईसाठी सोडायचे. मात्र आता चाराही नाही आणि बोडी, तलाव यासारखे जलस्रोतही आटले आहे. त्यामुळे जनावरांना घरातील गोठ्यातच ठेवून चारा विकत आणून त्यांना द्यावा लागत आहे.
हंगाम तोंडावर; हातचा पैसा चाऱ्यावर खर्च
शेतकऱ्यांचा खरीप हंगात अगदी तोंडावर आला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकऱ्यांना हंगामासाठी जुळवाजुळव केलेला पैसा चाऱ्यावर खर्च करावा लागत आहे. त्यामुळे हंगामासाठी खत, बियाणे यांची तजवीज कशी करावी, असाही प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
वैतागून पशुधनाची विक्री
चारा आणि पाणी टंचाईमुळे शेतकरी वैतागले आहे. पशुधन जगविण्यासाठी हंगामासाठी ठेवलेला पैसा खर्च होत आहे. त्यामुळे नाईलाजाने अनेक शेतकरी आपली जनावरे विक्रीसाठी बैलबाजारात नेत आहेत. जनावारांना विकून पावसाळ्यात पुन्हा जनावरे खरेदी करायचे, असा निर्णय अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे.
पाण्याचा प्रश्न बिकट
चाºयासोबत जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. नदी, तलाव, बोड्या यात पाणी नसल्याने जनावरांना पाण्यासाठी कुठे सोडावे, असा प्रश्न शेतकºयांना भेडसावत आहे. हातपंप, विहिरींनाही पाणी नाही. जिथे पाणी असेल तेथून बैलबंडीवर पाणी आणून जनावरांना पाजावे लागत आहे. यात शेतकरी मोटाकुटीस आला आहे.