शंकरपटाच्या बंदीबाबत शेतकऱ्यांत संभ्रम
By admin | Published: January 17, 2015 02:09 AM2015-01-17T02:09:49+5:302015-01-17T02:09:49+5:30
ग्रामीण भागात शंकरपटाची परंपरा कायम होती. परंतु मागील दोन वर्षांपासून शंकरपटावर बंदी आली आणि शंकरपटाच्या शौकिनांमध्ये नाराजीचा सूर उमटला.
नवरगाव : ग्रामीण भागात शंकरपटाची परंपरा कायम होती. परंतु मागील दोन वर्षांपासून शंकरपटावर बंदी आली आणि शंकरपटाच्या शौकिनांमध्ये नाराजीचा सूर उमटला. २०१४ मध्ये पटाला मान्यता मिळाली असली तरी २०१५ मध्ये पुन्हा शंकरपट अडचणीत सापडले आहेत.
नवरगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर बैलांचे शंकरपट भरविले जात होते. त्याची ख्याती पंचक्रोशीत होती. शेतीची कामे झाली की शेतकरी विरंगुळा म्हणून जानेवारीपासून ग्रामीण भागामध्ये शंकरपटाला सुरूवात करायचे. जानेवारीपासून ते मे-जूनपर्यंत गावागावांत शंकरपट भरायचे. शेतकरी त्या दृष्टीने बैलजोड्या तयार करून त्यांच्या खाण्याची विशेष व्यवस्था करायचे. एक-दोन महिन्यात बैल धष्टपुष्ट झाल्यानंतर शंकरपटात बैलाच्या शर्यती लावायचे. जिंकणाऱ्या बैलजोडीला विशेष बक्षिसे दिली जात. ज्या शेतकऱ्यांची जोडी जिंकली त्याच्याकडे पाहण्याचा इतर शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलून जायचा याच प्रतिष्ठेपोटी शेतकरी आपल्या घरी पाच-दहा बैलजोड्या ठेवायचे व परिसरात होणाऱ्या शंकरपटात बैलजोड्या हाकायचे.
या परिसरात देलनवाडी, रत्नापूर, मिनघरी, वासेरा, शिवणी, कुक्कुडहेटी, डोंगरगाव, वाढोणा व इतर परिसरात दोन ते चार दिवसांचे शंकरपट भरायचे. पट पाहण्यासाठी बैलगाड्या सजवून तर संपूर्ण पट चांगला दिसावा यासाठी तणसाचे भट्टे भरून न्यायचे. त्यावर बसून शंकरपटाचा आनंद लुटायचे. यासोबतच प्रत्येक गावात नाटक, तमाशा, गोंधळ आदी मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. त्यामुळे रात्रभर शेतकऱ्यांसह नागरिकांना यातून मनोरंजनाची संधी उपलब्ध व्हायची.
शंकरपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी परिसरामध्ये नाटकांची मोठी मागणी आहे. काही भागात व्यावसायिक नाटके सुरू झाली असून या नाटकांना रसिकांची चांगलीच गर्दी होत आहे. क्रांतिनायक, चिंधीबाजार, निजला का राजहंस माझा, अहंकार, गीता गाती ज्ञानेश्वर, जय जय गौरीशंकर, अरे माणसा माणसा, रमाई, अंकुर, निराधार हा पुत्र धरतीचा, कसोटी कुंकवाची, आई तुझं लेकरू अशा अनेक नाटकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मनोरंजन होणार असले तरी शंकरटापासून यावर्षी मात्र पटप्रेमींना मुकावे लागणार आहे.
याबाबत पोलिसांशी संपर्क केला असता शंकरपटावर बंदी असून याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील.
आतापर्यंत कुणालाही शंकरपटाची मंजुरी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)
शंकरपट आहे सांस्कृतिक ओळख
काही शेतकऱ्यांच्या बैलजोड्या इतक्या प्रसिद्ध होत असत की त्यांच्या बैलजोडीसोबत शर्यत लावण्यास इतर शेतकरी धजत नव्हते. परिसरातील रत्नापूर येथील काशिनाथ गहाणे, नवरगाव येथील आडकू गहाणे, धर्मा पा. बोरकर, विठोबा घुगूस्कर, देलनवाडी येथील सांबाजी लांजेवार, दादा पा. बोरकर, मसाजी डोंगरवार, नवरगाव येथील सोमाजी चनबनवार, वासेरा येथील आडकु बोरकर, अंतरगाव येथील नामा ठिकरे, रत्नापूर येथील अर्जुन लोधे हे शेतकरी हजारो रुपयांच्या बैलजोड्या केवळ पटासाठी बारमाही पोसायचे. नवरगाव येथील नीळकंठ हरबाजी निनावे यांनी स्वत:च्या शेतीची जागा देलनवाडी या प्रसिद्ध शंकरपटासाठी दान केली. पटामध्ये धावणाऱ्या बैलांच्या हालचालीवरून त्यांचा चेंडू, खराडी, चंद्रया, राज्या, वाघ्या, कुबड्या अशा वेगवेगळ्या नावाने उल्लेख केला जायचा.