शेतकरी धरणे आंदोलन
By admin | Published: June 11, 2017 12:29 AM2017-06-11T00:29:44+5:302017-06-11T00:29:44+5:30
शेतकरी बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्रात उभारलेल्या संपाच्या समर्थनार्थ संपूर्ण कर्जमाफी व शेतमाला हमीभाव मिळावा,....
विजय वडेट्टीवार : कर्जमाफी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी(बा) : शेतकरी बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्रात उभारलेल्या संपाच्या समर्थनार्थ संपूर्ण कर्जमाफी व शेतमाला हमीभाव मिळावा, याकरिता तळोधी(बा) येथील महात्मा फुले चौकात काँग्रेसेच विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आ. वडेट्टीवार यांनी म्हणाले की, मोदी सरकारने गेल्या तीन वर्षांत ‘अच्छे दिना’च्या नावाखाली सत्ता भोगून खुर्ची हडप केली आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणणारे नेते चूप झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी नि:स्वार्थपणे उभे आहोत. या आंदोलनात जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन आ. वडेट्टीवार यांनी केले. जिल्हा परिषदेचे गटनेते व माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर सांगितले की, निवडणुकीपूर्वी मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून सत्ता भोगण्याचे षडयंत्र करण्यात आले. या भागातील शेतकरी, शेतमजुरांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र सरकार कर्जमाफी व हमी भावाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे सरकारचे धोरण शेतकरी, शेतमजूरविरोधी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी, धानाला किमान तीन हजार रुपये भाव, स्वामीनाथन आयोग त्वरित लागू करा, शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे संपूर्ण वीज देयक माफ करावे, घरकूल, सिंचन विहिरी, शौचालय, गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात टाकणे आदी मागण्याकरिता धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे, जि.प. सदस्य खोजराम मरस्कोल्हे, नयना गेडाम, माजी पं.स. सदस्य विजय गावंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष विनोद बोरकर, नगरसेवक दिनेश गावंडे, रंजना पेंदाम, अशोक ताटकर, विलास लांजेवार, वसंतराव बडवाईक, वामनराव मदनकर, नगरसेवक शिरीष वानखेडे, नागभीड किसान सेल अध्यक्ष आनंद भरडकर आदी उपस्थित होते.