शेतकऱ्यांनो खचू नका, पूर्ण मदत करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 05:00 AM2021-11-22T05:00:00+5:302021-11-22T05:00:52+5:30
सायखेडा येथील ७० वर्षीय शेतकरी उद्धव टेंभुर्णे यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांना नुकसान झालेल्या धान पिकाची चरडी दाखवून आपली व्यथा मांडली. संपूर्ण आयुष्यात एवढा पाऊस कधीच बघितला नाही. आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत. या पिकातून काहीच हाती लागणार नाही. शेतातील हलाखीची परिस्थिती पाहून झोप लागत नाही. त्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गत आठवड्यात सावली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले. हातात आलेले पीक गेले असले तरी शेतकऱ्यांनो खचू नका, असा धीर देत शासन पूर्णपणे तुमच्या पाठीशी असून, कोणत्याही परिस्थितीत मदत करू, असा विश्वास पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला.
सावली तालुक्यातील मुंडाळा, पाथरी, उसरपार (तुकूम), मंगरमेंढा, पालेबारसा, सायखेडा येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, सीडीसीसी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, पं. स. सभापती विजय कोरेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार परीक्षित पाटील, गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विनोद नागदेवते, स्नेहा वेलादी, सोनाली लोखंडे उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, सावली तालुक्यात जवळपास ३५ गावांत ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहोत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला.
शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
सायखेडा येथील ७० वर्षीय शेतकरी उद्धव टेंभुर्णे यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांना नुकसान झालेल्या धान पिकाची चरडी दाखवून आपली व्यथा मांडली. संपूर्ण आयुष्यात एवढा पाऊस कधीच बघितला नाही. आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत. या पिकातून काहीच हाती लागणार नाही. शेतातील हलाखीची परिस्थिती पाहून झोप लागत नाही. त्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. मुक्तेश्वर मंगर, सुभाष तिवाडे, रामदास घनदाटे, राजेंद्र वाघरे, डेबूजी तिवाडे व सायखेडा येथील शेतकरी उद्धव टेंभुर्णे, आदी शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. पालकमंत्री वडेट्टीवार यांना नुकसान झालेल्या धान पिकाची सरडी दाखवून व्यथा मांडली.