राजुऱ्यात शेतकऱ्याचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:28 AM2017-12-20T00:28:23+5:302017-12-20T00:54:44+5:30
आॅनलाईन लोकमत
राजुरा : शेतकऱ्यांच्या नावावर केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकरीविरोधी धोरणे राबवून राज्य व केंद्र शासनाकडून उद्योगपतींचे लाड पुरविणे सुरू असल्याची घणाघाती टीका शेतकरी नेत्यांनी मंगळवारी राजुरा येथील मेळाव्यात केली. शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या मेळाव्यात कृषी धोरणांची परखड चिकित्सा करून शेतकऱ्यांच्या हितासाठी एल्गार पुकारण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा खासदार राजू शेट्टी, शेती प्रश्नांचे अभ्यासक विजय जावंधिया, माजी आमदार प्रभाकर मामुलकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, माजी आमदार एकनाथ साळवे, पंचायत समिती सभापती कुंदा जेनेकर, दत्तात्रय येगिनवार, सुधाकर कुंदोजवार, अॅड. मुर्लीधर धोटे, दिलीप नलगे, अविनाश जाधव, डॉ. एस. एम. करकड, दौलत भोंगळे व अन्य मान्यवर उपस्थित होते. खासदार शेट्टी म्हणाले, ‘खोटे बोला परंतु रेटून बोला’ या धुर्त नितीवर महाराष्ट्राचे सरकार काम करीत आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली कोणतीही आश्वासने भाजपाने पूर्ण केली नाहीत. शेतकरी बांधवांनो, मत नावाचे ब्रम्हास्त्र तुमच्याकडे आहे. याचा विचारपूर्वक वापर करा. भुलथापाना बळी पडू नका, योग्य निर्णय घ्या. आता संघर्ष करण्याची वेळ आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर सम्राटांना वटणीवर आणण्याचे काम मी केले. विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने सोडविण्यासाठी यापूढे मोठे आंदोलन उभारणार, असेही खासदार शेट्टी म्हणाले.
मेळाव्यात शेतीच्या विविध प्रश्नांवर विचारमंथन करण्यात आले. यावेळी साजीद बियाबानी, जसविंदरसिंग घोतरा, सुग्रीव गोतावळे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अॅड. अरुण धोटे, जिल्हा परिषद सदस्य गोदरू जुमनाके, मेघा नलगे, आबीद अली, वसंत मांढरे, अशोक नागपुरे, प्रवीण पडवेकर, सागर ठाकुरवार, वासुदेव गोरे, किशोर बावणे, सुनील बावणे, नासीर खॉन, गजानन गावंडे, देवेंद्र बेले, वासुदेव गोरे, विजय तेलंग, बळवंत शिंगाडे, दिनकर मालेकर, शिवचंद काळे, गजानन तुरानकर, दिवाकर माणुसमारे आदी उपस्थित होते. मेळाव्याप्रसंगी शेती विषयाची मूलभूत माहिती देण्यासाठी स्टॉल्स लावण्यात आले होते. प्रास्ताविक डॉ. एम.एम. बरकड व संचालन आनंद चलाख, प्रा. कविता कवठे यांनी केले. अविनाश जाधव यांनी आभार मानले.
भ्रष्ट नेत्यांना थारा देऊ नका -पुगलिया
गोसीखुर्द धरणाचे काम पूर्ण करण्याआधीच काहींनी निधी हडप केला. मतामध्ये मोठी ताकद असते. त्यामुळे योग्य वापर करून भ्रष्टाचारांना धडा शिकवा. अशा नेत्यांना यापुढे थारा देऊ नका, असे मत माजी खासदार नरेश पुगलिया यांनी शेतकरी मेळाव्यात मांडले.
मुक्त अर्थव्यवस्थेमुळे वाढल्या आत्महत्या- जावंधिया
राज्य आणि केंद्र शासन शेतकरीविरोधी धोरणे राबवून उद्योगपतींना फायदा मिळवून देत आहे. जोपर्यंत शेतकºयांचे प्रश्न निकाली निघत नाही; तोपर्यंत लढा सुरूच राहील, शेतकरी संघटनेने विदर्भाच्या शेतकऱ्यांचा घात केला. पूर्वी विदर्भातील शेतकरी संघटनेच्या प्रवासात क्रांतिकारी होता. मात्र, ही क्रांती संपत आहे. देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांचा घात करीत असून, मूक्त अर्थव्यवस्थेमुळेच आत्महत्या वाढल्या आहेत, असा आरोप शेती प्रश्नांचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी केला.
अधिवेशन संपण्यापूर्वीच मदत करा-राजू शेट्टी
बोंडअळीने राज्यातील शेतकऱ्यांचे सुमारे पाच हजार कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ आश्वासनांची घोषणा न करता नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी आर्थिक मदत करा; अन्यथा मंत्र्यांना विदर्भात फिरू देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. खासदार शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असून हमीभाव देण्याचे आमिष दाखवून धोका दिला आहे. बाहेरच्या देशांतून शेतमाल आयात करणारे हे सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवित आहे. राज्यातील शेतकरी हतबल झाला. पण, शेतकऱ्यांनी कदापि आत्महत्या करू नये. आत्महत्येने कधीच प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी हक्कांसाठी लढा देणे हाच पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध सज्ज झाले पाहिजे, असेही खा. शेट्टी यांनी नमुद केले.