शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:31 AM2019-06-08T00:31:15+5:302019-06-08T00:32:02+5:30
आजपासून मृग नक्षत्राची सुरुवात होत असली तरी पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वाढत्या तापमानाने शेतकरीवर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असून आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : आजपासून मृग नक्षत्राची सुरुवात होत असली तरी पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वाढत्या तापमानाने शेतकरीवर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असून आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
शेतकरी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडयापासून शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकण्यात व्यस्त असतो. यावेळी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली. सूर्याचा पारा सातत्याने ४५ अंशापार जात राहिला. तरीही शेतकऱ्यांनी उसंत घेतली नाही. परंतु यावर्षी मृग नक्षत्र लागला तरी पावसाने अद्यापही हजेरी न लावल्याने तापमान कमी होण्याऐवजी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. २५ मेपासून रोहिणी नक्षत्रास प्रारंभ झाला. परंतु सदर नक्षत्र अत्यंत तप्त आणि कोरडा गेल्याने आजपासून लागणाऱ्या मृग नक्षत्राकडे शेतकºयांच्या नजरा लागून आहेत. आतातरी पाऊस येईल या आशेने शेतकरी आकाशाकडे टक लावून बघत आहे. परंतु आकाश निरभ्र दिसत असून सूर्याचे आग ओकणेही सुरूच आहे, त्यामुळे शेतकरी काहिसा चिंताग्रस्त झाला आहे. रोहिणी नक्षत्राने शेतकºयांना हुलकावणी दिल्याने तसेच उन्हाचा तडाखा अजूनही सुरूच असल्याने पुढे कशी स्थिती राहील, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
पूर्वीच्या काळी शेतकरी घरातील पारंपरिक बि-बियाण्यांचा वापर करीत असे. परंतु बदलत्या काळाच्या ओघात काही वर्षांपासून पेरणीसाठी संकरित बि-बियाण्यांचा वापर करीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून सध्या बि-बियाणे, खते यांची जमवाजमव सुरू असून आवश्यक तयारीत शेतकरी गुंतला आहे. तालुक्यात सर्वत्र भातपिकाचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. भात पेरणीपूर्वी मशागतीसाठी बहुसंख्य शेतकरी ट्रॅक्टर, पॉवर ट्रील यांना प्राधान्य देत असतात. या यंत्राद्वारे मशागतीची कामे पूर्ण झाली असून पावसाची प्रतीक्षा आहे.
उन्हाळी पीक निघाले
ब्रह्मपुरी तालुक्यात अनेक शेतकºयांनी उन्हाळी धान पिकांची लागवड केली होती. आता हा हंगाम संपला असून अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पीक काढले आहे. आता हेच शेतकरी पुन्हा खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. मात्र शेतकºयांना आता पावसाची प्रतीक्षा आहे.
कृषी केंद्र ओस
मृग नक्षत्र लागूनही पावसाचा अजूनही थांगपत्ता नसल्याने तसेच पावसाचे कुठलेही लक्षण दिसत नसल्याने शेतकºयांनी बि-बियाण्यांच्या व खतांच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे तालुक्यातील कृषी केंद्रे ओस पडली आहेत.