अतिपावसाने शेतकऱ्यांना तोंडचा घास हिरावण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:30 AM2021-09-21T04:30:45+5:302021-09-21T04:30:45+5:30
पळसगाव : बल्लारपूर तालुक्यातील अनेक शेतकरी कापूस पिकावर होणाऱ्या बोंड अळीच्या प्रादुर्भावाला कंटाळून सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. जून महिन्यात ...
पळसगाव : बल्लारपूर तालुक्यातील अनेक शेतकरी कापूस पिकावर होणाऱ्या बोंड अळीच्या प्रादुर्भावाला कंटाळून सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. जून महिन्यात पाऊस समाधानकारक पडत असल्याने बळिराजाने पेरणी व टोकन पद्धतीने पूर्ण रानात बी टाकले आहे; परंतु आता तेच पीक कापणीला आले असताना सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन काळे पडून सडण्याच्या मार्गावर आहे.
आजपर्यंत सोयाबीन पिकांना पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी सुरुवातीला डवरणी, खुरपणी, निंदण वेळोवेळी केली आहे. सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी खोडमशी, चक्री भुंगा, उंट अळी, तंबाखूतील पाने खाणारी अळी, पाने पोखरणारी अळी, फुलकिडे, मावा, तुडतुडा, पांढरी माशी आदी किडींचे व्यवस्थापन केले आहे. कृषी विभागाचा सल्ला घेऊन खोडमशी व चक्री भुंगासाठी पीक १५ ते २२ दिवसांचे असताना कीटनाशकाची फवारणी केली. फुलोरा अवस्थामध्ये अळीचा प्रादुर्भाव होऊन पीक नष्ट होऊ नये म्हणून दुसरी फवारणी केली होती. मुलाबाळाप्रमाणे पिकाची जोपासना केली आहे.
आता संपूर्ण पीक हे कापणीला झाले आहे, तर निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाची सतत रिपरिप बघून पीक हातात येईल की नाही या विवंचनेत शेतकरी आहे. सोयाबीनच्या शेंगाची भरणी बघून यावर्षी उत्पन्नात वाढ होईल अशी आशा बाळगली होती, पण सततच्या पावसामुळे शेंगा सडून पीक पूर्णत्वास वाया जाण्याची स्थिती आहे. लागवडीसाठी आजपर्यंतचा केलेला खर्चही निघेल की नाही या चिंतेत शेतकरी आहे.
कोट
सोयाबीन पीक कापणीला आले आहे; परंतु सतत सुरू असलेल्या पावसामुळे तोंडात आलेला घास निसर्ग हिरावून घेतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्ज काढून पिकाची लागवड केली. आता त्याच कर्जाचा भरणा कसा करायचा, हा प्रश्न पडलेला आहे.
- पंढरी वासुदेव उपरे, शेतकरी, पळसगाव.
200921\img20210918152621.jpg~200921\img20210918152608.jpg
caption~caption