बँक व तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची पायपीट
By admin | Published: July 8, 2016 12:51 AM2016-07-08T00:51:54+5:302016-07-08T00:51:54+5:30
खरीप हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची लागवडीसाठी जुळवाजुळव सुरु झाली आहे.
गुंजेवाही : खरीप हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची लागवडीसाठी जुळवाजुळव सुरु झाली आहे. अशातच पिककर्ज मिळविण्यासाठी बँक व तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची पायपीट होत असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामीण भागात नाराजीचा सूर उमटत आहे.
यावर्षी हवामान विभागाने पर्जन्यवृष्टी संदर्भात चांगला अंदाज वर्तविला आहे. यामध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडेल, असे संकेत दिल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात आशेचा किरण दिसत आहे. यावर्षी तरी निसर्गराजा कृपा करेल, अशी प्रार्थना करीत शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. मे महिन्याच्या अंतीम टप्प्यातच बहुतांश शेतकऱ्यांनी वखरणी करुन व काडीकचरा वेचून पेरणीसाठी शेती सज्ज केली. प्रखर उन्हातच शेतकरी मशागतच्या कामाला जोमाने लागला होता. सद्यस्थितीत अनेकांच्या पेरण्या झाल्या. आता शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत आहे. त्यामुळे काहीजण नवीन पीककर्ज तर काहीजन पूनर्गठन करुन पिककर्ज घेण्यासाठी कागदपत्राच्या जुळवाजुळवीत लागला आहे. या कागदपत्राची ज़ुळवाजुळव करताना तलाठी कार्यालयाकडून प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. पण काही ठिकाणी तलाठीच जागेवर मिळत नाही. तर काही ठिकाणी तलाठ्याकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. बँक व्यवस्थापनही प्रतिसाद द्यायला तयार नसल्याने पायपीट होत आहे. (वार्ताहर)