अन्यायाविरुद्ध शेतकऱ्याचे बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:09 PM2018-03-26T23:09:42+5:302018-03-26T23:10:33+5:30
आॅनलाईन लोकमत
ब्रह्मपुरी : जमिनीचा मालकी हक्क डावलल्याच्या निषेधार्थ गवर्ला (चक) येथील आसाराम सखाराम सोनडवले या शेतकऱ्याने रविवापासून मांगली ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
आसाराम सोनडवले यांना अन्य शेतकऱ्यांसह १९६० मध्ये जमीन मिळाली. त्यावेळी ही जमीन भोगवटदार दोनमध्ये होती. दरम्यान, तत्कालिन तहसीदार व तलाठ्याने शासकीय परिपत्रकाचा आधार घेवून अन्य शेतकऱ्यांसोबत ही जमीन वर्ग एकमध्ये करण्यात आली. पण, काही कालावधीनंतर सोनडवले यांच्याच जमिनीवर अटी लावल्या. अन्य जमीन धारकांबाबत शर्ती लावल्या नाहीत. त्यामुळे मालकी हक्कावर गदा आली आहे. वर्ग दोनचा पेरा काढावा आणि वर्ग एकमध्ये करावी, अशी मागणी सोनडवले यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, दखल घेण्यात आली नाही. प्रशासनाच्या चुकीमुळेच हा प्रकार घडला. त्याला प्रशासनच दोषी आहे. त्यामुळे सोनडवले यांनी रविवारपासून मांगली ग्रा. पं. समोर आमरण उपोषण सुरु केले. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही सोनडवले यांनी व्यक्त केला आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, उपविभागीय अधिकारी, आमदार विजय वडेट्टीवार, तसेच ठाणेदारांना निवेदनाच्या प्रती देऊन शासनाने लक्ष वेधले आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे जमिनीच्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे आंदोलनाचे पाऊल उचलले. जिवाला धोका झाल्यास प्रशासनच जबाबदार राहील, असेही सोनडवले यांनी निवेदनात नमूद केले आहे.