शेतकऱ्यांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:56 AM2019-06-21T00:56:28+5:302019-06-21T00:57:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी २४ जुलै या अंतिम दिनांकापूर्वी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, योजनेतील सहभागासाठी तात्काळ जवळच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत कर्जदार व बिगार कर्जदार शेतकºयांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत २४ जुलैपर्यंत निश्चित केलेली आहे.
या योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित पीकासाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामातील पिकांसाठी २ टक्के व नगदी पिकासाठी ५ टक्के असा आहे. सर्व पिकासाठी जोखिमस्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. कर्जदार शेतकºयांनी सदर योजना बंधनकारक आहे. अशा शेतकऱ्यांना कर्ज मंजूर कालावधी १ एप्रिल ते ३१ जुलै २०१९ आहे. अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र ठरणार आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सन २०१९-२० साठी सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय पीक कर्ज दर समितीने निश्चित केलेले दराप्रमाणे विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के व नगदी पिकाकरिता ५ टक्के विमा हप्ता हा शेतकऱ्यांना भरावयाचा आहे.
विमा संरक्षणाच्या बाबी प्रतिकुल हवामान घटकामुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे, हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान योजनेमध्ये सहभाग घेणेसाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करताना सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमाच्या अर्जासोबत पीक पेरा प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेल्या बँक खाते पुस्तकाची प्रत तसेच आधार कार्ड छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. आधार कार्ड उपलब्ध नसल्यान आधारकार्ड नोंदणी पावतीसह ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.
खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना व फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँकेचे कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरित बँकेशी संपर्क साधावा.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बँक खाते क्रमांकच अर्जावर नमूद करावा लागणार आहे. या संदर्भात ज्या शेतकऱ्यांकडे अद्यापही आधार कार्ड उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांनी त्वरित आधार नोंदणी केंद्राशी संपर्क करून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून आधार क्रमांक घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
योजनेत समाविष्ट पिके
या योजनेंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल. सदर योजना राज्यात शासनाने खरीप २०१९ हंगामासाठी केलेल्या महसूल मंडळ, मंडळगट किंवा तालुकास्तरावर पिकांसाठी राबविण्यात येणार आहे.