चिंचाळा व मांगली (रै.) येथील शेतकरी त्रस्त
By admin | Published: June 21, 2014 01:27 AM2014-06-21T01:27:06+5:302014-06-21T01:27:06+5:30
तालुक्यातील चिंचाळा (रै.) व मांगली (रै.) शेतशिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे.
भद्रावती : तालुक्यातील चिंचाळा (रै.) व मांगली (रै.) शेतशिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे. यामुळे उभे पीक वाळले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी याबाबत वीज मंडळाकडे तक्रार केली आहे. परंतु या विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वीज पुरवठा त्वरित सुरू करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनी दिला आहे.
१४ मार्च २०१४ पासून चिंचाळा (रै.) येथील देगवडे यांच्या शेताजवळील डिपी बंद आहे. याबाबत संबंधित लाईनमनला सूचना देण्यात आली. ट्रान्सफॉर्मर जळाले आहे नवीन बदलवावे लागेल, असे त्यांनी सांगितले. ट्रान्सफॉर्मर लावण्यासाठी तब्बल तीन महिने लावण्यात आले. लावण्यात आलेली डी.पी. सुद्धा कमी क्षमतेची असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यानंतर शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असलेला भाजीपाला, आवळ्याचे झाड, चिकू, लिंब व इतर फळ झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेली नुकसान भरपाई वीज मंडळ देणार का, असा प्रश्न शेतकरी करीत आहे.याशिवाय येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
संबंधित नुकसानग्रस्त शेतकरी वीज मंडळाच्या कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेले असता, कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट झाली नाही. भ्रमणध्वनीवरुन बोलणे झाले. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वीज मंडळाच्या कामाबाबत शेतकऱ्यांनी खासदार तथा आमदारांकडे तक्रार केली आहे. याबाबत आमदार मुनगंटीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न लावण्याचे शेतकऱ्यांना कळविले आहे. मात्र अद्यापही कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देवून दिलासा द्यावा, अशी मागणी विजय वानखेडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
३५१ शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत
चंद्रपूर : चिमूर तालुक्यात २०१० ते २०१३ या वर्षात ३५१ शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी डिमांड भरली आहे. मात्र अद्यापही त्यांना कनेक्शन देण्यात आले नाही. ३५१ वीज कनेक्शन जोडणी बाकी असून २०१४मध्ये डिमांड भरलेल्यांची संख्या वेळगी आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीला विचारना केली असता, ज्या कंपनीला कनेक्शन जोडण्याचे काम दिले होते.ती कंपनी कामच करीत नव्हती. आता त्या कंपनीला डिफाल्टर ठरवून ए.एम.जी कंस्ट्रक्शन कंपनीला काम दिल्याचे सांगितले जाते. काही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन जोडण्याचे काम सुरू असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात वीज जोडणी करण्यात आली नाही. २०१३- १४ मध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे तर रब्बी पिकाचे गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.पेरणीच्या ऐनवेळी बी- बियाणे घ्यायची ताकत सुद्धा शेतकऱ्यांमध्ये राहिलेली नाही. दुसरीकडे पाच वर्षांपासून वीज कनेक्शनसाठी डिमांड भरूनसुद्धा शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागावा, असे राष्ट्रवादी किसान सभेचे सुरेश रामगुंडे यांनी निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी वीज वितरण कंपनीसह शासनाला निवेदन देवून वीज कनेक्शन त्वरित लावून देण्याची मागणी केली आहे.