चंद्रपूर जिल्ह्यात नलेश्वर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 02:25 PM2020-03-13T14:25:32+5:302020-03-13T14:25:53+5:30
सिंदेवाही तालुक्यातील नलेश्वर येथील शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास नलेश्वर शिवारात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील नलेश्वर येथील शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास नलेश्वर शिवारात घडली.
माणिक जगण नन्नावरे (५५) असे मृतकाचे नाव आहे. माणिक नन्नावरे हे दुबार धान रोवणी केलेल्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. परत येताना ते एका पाणवठयाजवळ शौचास गेले असता अचानक एका पट्टेदार वाघाने त्याच्यावर झडप घातली. या हल्ल्यात माणिक नन्नावरे हे जागीच ठार झाले. दरम्यान, वाघाने माणिकला घटनास्थळापासून नलेश्वर विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या वन टेकडी येथील कालव्याजवळ ओढत नेले. या परिसरातील गेल्या काही दिवसातील वाघ हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊराव तुपे, क्षेत्र सहाय्यक एच. बी. उसेंडी हे रात्री घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, मृतकाच्या कुटुंबीयांना वनविभागाकडून २५ हजार रुपये रोख व चार लाख ७५ हजारांचा धनादेश आर्थिक मदत देण्यात आली.