सीमेवरील शेतकरी जगत आहेत दारिद्राचे जीणे !

By Admin | Published: July 23, 2016 01:44 AM2016-07-23T01:44:02+5:302016-07-23T01:44:02+5:30

महाराष्ट्र- आंध्र प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातील नक्षलग्रस्त परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

The farmers living in the border are living in poverty! | सीमेवरील शेतकरी जगत आहेत दारिद्राचे जीणे !

सीमेवरील शेतकरी जगत आहेत दारिद्राचे जीणे !

googlenewsNext

सिंचनाचा अभाव : निसर्गाची अवकृपा आणि शासनाचेही लक्ष नाही
राजुरा : महाराष्ट्र- आंध्र प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातील नक्षलग्रस्त परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. जीवनभर काबाडकष्ट करुनसुद्धा शेतकरी सुखी नाही. सूर्योदयापूर्वीपासून तर सूर्यास्तापर्यंत शेतात राबूनही पोटच्या पोराला शिक्षण व मुलीचे लग्न करावयाची ऐपत या भागातील शेतकऱ्यांजवळ नसल्याचे भयावह चित्र आहे. सिंचनाचा अभाव, निसर्गाची अवकृपा व शासनाचे दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत आहे.
ऊन, पाऊस, वाऱ्याची पर्वा न करता जीवाचे रान करुन काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील शेतकरी लिंगा सोयाम २० वर्षापासून शेती करीत आहे. काबाडकष्ट करुन, दिवसभर शेतात राबूनसुद्धा आज त्याच्या हातात काहीच शिल्लक नाही. तीन एकरामध्ये राब-राब राबत आहे. या आदिवासी शेतकऱ्याला दोन मुले व एक मुलगी आहे. गरीब परिस्थितीमुळे मुलांचे शिक्षण न झाल्याची खंत मनात आहे. कापसाला भाव मिळत नाही, विक्रीसाठी बाजारपेठ नाही, फेडरेशन लवकर पैसे देत नाही. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात नगदी पैसे देणाऱ्याला कापूस विकतो. मृग नक्षत्राच्या पहिल्या सरीने शेतकरी सुखावतो. पेरणीपूर्व प्रक्रिया व पेरणी नंतरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर असे वाटते की, कधी कापूस निघेल, कधी विकणार, मुलामुलींचे लग्न करणार, पत्नीसाठी कपडे घेणार. परंतु शेतकऱ्यांच्या जीवनात कधी दिवाळी नसते. केवळ अंधकारमय जीवन जगण्यासाठी शेतकऱ्यांचा जन्म झाला काय, असा सवाल लिंगा सोयाम यांनी शासन व्यवस्थेला विचारला आहे. विठोबा लांडे हासुद्धा चार एकर जमीन असलेला शेतकरी २५ वर्षापासून शेती करतो. दोन मुलांचे कसेबसे शिक्षण झाले. मुलीच्या लग्नाची चिंता मनाला भेडसावीत आहे. वाटलं कापूस होईल. पैसा मिळणार, मुलीचे लग्न उरकून टाकू, परंतु अकाली पावसामुळे मनातील आकांक्षेवर पाणी फेरले. कापूस नष्ट झाला, त्यामुळे मुलीचे लग्न करु शकत नाही. भांडवलदार व शेतकऱ्यांचे कैवारी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. आमच्या भागातील पाण्याची साठवण उद्योगांना दिल्या जाते, ही शोकांतिका आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या मुबलक सोई उपलब्ध होणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार नाही. राजुरा परिसरातील शेतकरी गोविंद गायकवाड तीन एकराचा मालक असलेला शेतकरी म्हणाला की, शेतकऱ्यांकडे शासनाचे लक्ष नाही. ५० वर्षापासून शेती करीत आहे. आज मायाजवळ काही नाय, राजकीय नेते व शासकीय अधिकारीच शेतकऱ्यांना लुटत आहे. राज्यातील सीमावर्ती नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्यांची अवस्था भयावह आहे. शासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांनी त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)

 

Web Title: The farmers living in the border are living in poverty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.