महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी तेलंगणात धाव
By admin | Published: June 19, 2014 12:02 AM2014-06-19T00:02:43+5:302014-06-19T00:02:43+5:30
गेल्या आठवडापूर्वी तेलंगणा सरकारनी राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी केली. यानंतर आता बियाणे खरेदीसाठी सबसिडी दिली जात आहे. यामुळे बियाणे व खतांच्या कमी दरात उपलब्धीमुळे शेतकऱ्यांनी
वनसडी : गेल्या आठवडापूर्वी तेलंगणा सरकारनी राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी केली. यानंतर आता बियाणे खरेदीसाठी सबसिडी दिली जात आहे. यामुळे बियाणे व खतांच्या कमी दरात उपलब्धीमुळे शेतकऱ्यांनी तेलंगणातील कृषी केंद्राकडे धाव घेतली आहे.
महाराष्ट्रातील कृषी केंद्रातील बियाणे व खतांच्या दरात व तेलंगणातील कृषी केंद्राच्या दरात बरीच तफावत आहे. सध्या तेलंगणात सबसिडीप्रमाणे एक हजार ६०० रुपयांत सोयाबिनची ३० किलोची बॅग विकली जाते. त्यामुळे येथील सहकारी सोसायट्यांत गर्दी वाढली गेली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याशेजारच्या बेला, आदिलाबाद, आसिफाबाद बाजारपेठेतील कृषी केंद्रात अशीच गर्दी दिसून येते. बियाणे खरेदी करून नेण्याचा खर्च पकडूनही पैशाची बचत होत असल्याने शेतकऱ्यांनी ही वाट पकडल्याचे दिसते. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पिकांवरील किडींमुळे शेतकऱ्यांना दुहेरी मार बसल्याने उत्पादनात घट आली. वारंवार बसणाऱ्या फटक्यांमुळे शेतकरीही आर्थिक संकटात सापडला गेला. कसेबसे उसणवारी करून आता शेतकरी बीज पेरणीच्या कामी लागला आहे. पाऊसही लांबणीवर गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा नैसर्गिक संकट ओढवले तर परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची चिन्हे आहे.
नानाविध कंपन्यांनी आपला प्रचार गावागावात चालविला आहे. शेतकऱ्यांना पटविण्यासाठी विविध प्रलोभणे देऊन बियाणे खरेदीसाठी आकृष्ठ केले जात आहे.
मागील वर्षी पावसामुळे सोयाबिनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात खराब झाले. त्यामुळे बाजारपेठेत बोगस बियाणांनी शिरकाव केला आहे. अशा परिस्थितीत बीजाई उगवली नाही तर पुन्हा बियाणे खरेदी करून पेरणी करणे न परवडणारे आहे. महागडी बियाणे खरेदी करूनही पीक उगवलेच नाही तर उपयोग काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे. त्यामुळे बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील बाजारपेठांपेक्षा तेलंगणातील बाजारपेठांतील कृषी केंद्रात शेतकरी मोठ्या संख्येने धाव घेत आहे. (वार्ताहर)