शेतकरी अपघात विम्याबाबत जनजागृती हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:24+5:302021-06-03T04:20:24+5:30
चंद्रपूर: शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यांना जीवन जगण्याचे पाठबळ मिळावे, यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात ...
चंद्रपूर: शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यांना जीवन जगण्याचे पाठबळ मिळावे, यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. मात्र स्थानिक पातळीवर पाहिजे तशी जनजागृतीच झाली नसल्याने या योजनेपासून आजही शेतकरी अनभिज्ञ आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तत्कालीन युती सरकारच्या काळात भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. मात्र गाव, वस्त्यावर या योजनेची माहितीच पोहचली नाही. योजनेचा लाभ घ्यायचा झाल्यास मृत्यू अथवा अपघातानंतर तीन महिन्यात विहीत नमुन्यात कृषी विभागाकडे अर्ज दाखल करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक शेतकरी अर्ज दाखल करीत नसल्यामुळे त्यांना आर्थिक लाभापासून वंचित रहावे लागत आहे.
शेती व्यवसाय करताना होणाऱ्या अपघाताचा या योजनेत समावेश आहे. वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, तसेच अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांवर मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. यात अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यास किंवा त्यांच्या वारसास दोन लाख रुपये मिळतात. यात त्याचा मुख्य व्यवसाय शेती आणि तो शेतकरी असावा, हिच एकमेव अट आहे.