शेतकरी खासगी सावकाराच्या दारात
By admin | Published: December 2, 2015 12:45 AM2015-12-02T00:45:00+5:302015-12-02T00:45:00+5:30
शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असल्या तरी या योजनेतील अनुदान मिळण्यास कमालिचा विलंब होत असल्याने ..
अधिकाऱ्यांचा गलथान कारभार : योजनेचे अनुदान मिळण्यास विलंब
शंकर चव्हाण/ संघरक्षित तावाडे जिवती
शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असल्या तरी या योजनेतील अनुदान मिळण्यास कमालिचा विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना कर्जासाठी नाईलाजाने खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. कर्ज घेऊन शेतकरी योजनेतील काम पूर्ण करतात. मात्र वर्षानुवर्षे सबंधित शेतकऱ्याला अनुदान मिळविण्यासाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. जीवती तालुक्यातील हे वास्तव शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत ढकलणारे आहे.
जिवतीवरुन १२ किमी अंतरावरील टेकामांडवा येथील शेतकरी बळीराम रामा गोरे याला रोजगार हमी योजनांतर्गत विहीर बांधण्यासाठी तीन लाख मंजूर झाले. त्यानुसार २०१४-१५ साली बळीराम गोरे याने शासनाकडून लवकरच अनुदान मिळेल या आशेपोटी खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन शेतात विहीरीचे बांधकाम पूर्ण केले. मात्र विहीरीचे काम पूर्ण होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला. परंतु आतापर्यंत त्याला केवळ ८० हजार रुपयांचा एकच हप्ता मिळाला आहे. विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्याचे अभियंत्याकडून मुल्यमापन (एम.बी.) सुद्धा करण्यात आले. पण कामाचे विल मात्र अजूनपर्यंत मिळालेले नाही. बिल मिळावे यासाठी बळीराम गोरे जीवती पंचायत समितीच्या वारंवार येतो. परंतु येथील अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीचे उत्तर देऊन त्याला परत पाठवित आहेत.
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे. शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर योजना पोहचवा, असे शासनाचे अधिकाऱ्यांना निर्देश असताना अधिकाऱ्यांकडून मात्र शासनाच्या निर्देशाचे पालन केले जात नसल्याचे दिसून येते. तालुक्यात केवळ एकाच शेतकऱ्यांची अशी अवस्था नाही अनेक शेतकऱ्यांना योजनेच्या अनुदानापासून मुकावे लागत आहे. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.