कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी पणन महासंघाला नाकारले

By admin | Published: January 8, 2016 01:49 AM2016-01-08T01:49:30+5:302016-01-08T01:49:30+5:30

कापसाचे दर आज ना उद्या वाढेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु कापूस दरवाढीचे कोणतेच संकेत शेतकऱ्यांना मिळाले ....

Farmers rejected cotton yarn for selling cotton | कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी पणन महासंघाला नाकारले

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी पणन महासंघाला नाकारले

Next

कापूस दरवाढीचा व्यापाऱ्यांना लाभ : खासगी बाजारपेठेत चार हजार ८०० रुपये भाव
प्रकाश काळे गोवरी
कापसाचे दर आज ना उद्या वाढेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु कापूस दरवाढीचे कोणतेच संकेत शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री केली. कापूस सरतेशेवटी खासगी बाजारपेठेत कापसाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांनी चक्क पणन महासंघाला कापूस विकण्यास नकार देत खासगी व्यापाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
कापूस शेतकऱ्यांचे नगदी पिक आहे. शेतकऱ्यांची वर्षभराची भिस्त कापूस या एकमेव पिकावर अवलंबून असते. यावर्षी शेतकऱ्यांनी उसनवारीने कर्ज घेऊन शेती केली. दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करुन कशीबशी शेती पिकविली. परंतु यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. शेतीवर केलेला खर्च भरुन निघणार नाही, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे. शेतीवर अतोनात खर्च करुनही उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकऱ्यांसमोर असलेला कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कर्ज घेऊन शेती केल्यानंतर घामाच्या दामासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु झाला. परंतु शेतकऱ्यांच्या पदरी कायमची निराशाच आली. हिवाळी अधिवेशनानंतर शेतमालाचे दर वाढतील, या आशेवर शेतकरी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरात जागा नसतानाही अडचण सहन करीत कापूस भरुन ठेवला. परंतु त्यानंतर कापूस दरवाढीची आस कायमची संपल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कापसाची कवडीमोल भावात नाईलाजाने विक्री करुन आपली अडचण भागविली. शेतकऱ्यांच्या घरी असलेला कापूस आता संपायला आला असताना खासगी बाजारपेठेत कापसाला प्रति क्विंटल चार हजार ८०० ते आठशे रुपये दर देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी कापूस खरेदी करणाऱ्या पणन महासंघाकडे पाठ फिरविली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगली मागणी असल्याने पाकिस्तान, बांग्लादेश, इंडोनेशिया या देशात भारतीय कापूस निर्यात होत आहे.
त्यामुळे खासगी बाजारपेठेत कापसाला सुगीचे दिवस आले आहे. हमीभावावर कापसाची कवडीमोल भावात खरेदी करणाऱ्या पणन महासंघाकडे शेतकऱ्यांनी कापूस विकण्यास चक्क नकार दिल्याने सरकारी कापूस संकलन केंद्रावर गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट पसरला आहे. जिनिंग ओस पडल्या आहेत.
खासगी व्यापाऱ्यांकडे कापसाला चांगला दर मिळत असल्याने कापसाची आवक वाढली आहे. त्याचा पूरेपूर फायदा खासगी व्यापारी उचलत आहे. कापसाची वाढती आवक पाहून व्यापारी कापसाचे भाव पाडत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.

कापूस दरवाढीचा फायदा कुणाला?
शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपत असताना खासगी बाजारात कापसाचे दर वाढले आहे. गरजेपोटी कवडीमोल भावात शेतकऱ्यांनी कापसाची विक्री आहे. आज ना उद्या कापूस दरवाढ होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी आर्थिक चणचण असतानाही पोटाला चिमटा घेत दिवस काढले. आता शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपला असून कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ खासगी व्यापाऱ्यांना होणार आहे.

कापूस विदर्भातील शेतकऱ्यांचे नगदी पिक आहे. मायबाप सरकारने कापसाला तोकडा हमीभाव दिला. त्यामुळे शेतीवर केलेला खर्च भरुन निघाला नाही. आता खासगी बाजारपेठेत कापसाचे भाव वाढले आहे. मात्र शेतकऱ्यांजवळ कापूस उरला नसल्याने कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ व्यापाऱ्यांना होणार आहे.
- सुनील पिंपळशेंडे, शेतकरी, वनोजा

Web Title: Farmers rejected cotton yarn for selling cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.