वाघांच्या बंदोबस्तासाठी शेतकरी धडकले वनविभागाच्या कार्यालयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:32 AM2021-09-05T04:32:01+5:302021-09-05T04:32:01+5:30
गेवरा : सावली वनपरिक्षेत्रातील वाढत्या वाघांच्या हल्ल्यातील मनुष्यांचे बळी जाण्याच्या घटनांची मालिका दिवसागणिक वाढत आहे. वनक्षेत्राशिवाय आता मनुष्य ...
गेवरा : सावली वनपरिक्षेत्रातील वाढत्या वाघांच्या हल्ल्यातील मनुष्यांचे बळी जाण्याच्या घटनांची मालिका दिवसागणिक वाढत आहे. वनक्षेत्राशिवाय आता मनुष्य वस्ती व शेतशिवारातही वाघांच्या हल्ल्यात नागरिकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे वाघाच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी नागरिकांचे एक शिष्टमंडळ सावली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयावर धडकले. त्यानंतर तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले.
गेवरा खुर्द गावातील शालीन चापले नामक शेतकरी आपल्या शेतात काम करीत असताना पट्टेदार वाघाने हल्ला चढवून ठार केले, त्यामुळे परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सुरू असलेल्या शेतीच्या धान पिकाच्या निंदनाची मोठ्या प्रमाणात कामे शिल्लक आहेत. परंतु वाघांच्या शेतशिवारातील वाढत्या हस्तक्षेपाने शेतकऱ्यांच्या शेतातील कामावर मजूर महिला येण्यास धजावत नाहीत. याचा मोठा परिणाम पिकांसह शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर होत आहे. या सर्व परिस्थितीला नियंत्रित करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. मात्र स्थानिक नागरिकांच्या सहकार्याशिवाय वनविभाग वाघांच्या बंदोबस्तासाठी पुढे धजावत नसल्याचे समोर येत आहे. एका वर्षात या भागातील तीन जणांना वाघाच्या हल्ल्यात आपले जीव गमवावे लागले आहेत. पाचपेक्षा जास्त लोक जखमी झाले असून शेकडो पाळीव पशूंची हानी झालेली आहे. वनविभागाने त्वरित कायम उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी निवेदनातून दिला आहे.