चंद्रपूर जिल्ह्यात मजुरांसाठी शेतकऱ्यांची सर्वत्र शोधाशोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 02:16 PM2017-11-14T14:16:26+5:302017-11-14T14:18:05+5:30
शेतकऱ्यांना मजूरच मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यातून मजूर आणून कापूस वेचणीची कामे करावी लागत आहेत.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : गोंडपिंपरी तालुक्यात कोणतेही मोठे उद्योग नसल्याने औद्योगिक विकास झाला नाही. त्यामुळे कामासाठी या भागातील मजूरवर्ग इतर जिल्ह्यात स्थलांतरित होतात. सध्या धान कापणी व कापूस वेचणीची कामे केली जात आहेत. मात्र शेतकऱ्यांना मजूरच मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यातून मजूर आणून कापूस वेचणीची कामे करावी लागत आहेत.
गोंडपिपरी तालुक्यात धान पिकाचे सर्वाधिक उत्पादक घेतले जाते. मात्र तालुक्यात सिंचनाची सुविधा फारशी नसल्याने अनेकांनी यंदा धानासोबत कापसाचे पीक घेतले. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला. जून, जुलै महिन्यात पावसाने दगा दिला. त्यामुळे दुबार, तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर ठाकले होते. त्यानंतर बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. याच पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी धान, कापसाचे पीक घेतले. मोठ्या कष्टाने हे पीक जगविले. आता धान कापणीच्या अवस्थेत आहे. कापूस काढणीचा हंगाम आहे. शेतशिवार पांढरे शुभ्र दिसत आहे.
आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात कापूस शेतात फूटलेला आहे. धानासह कापूस वेचण्याचा हंगाम एकत्र आल्याने मजुरांचा तुटवडा शेतकऱ्यांना जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी शेतमजुरांच्या शोधात परिसरात भटकंती करीत आहे. पाच ते सहा रुपये प्रती किलो कापूस वेचणीचा दर आहे. जादा पैसे आणि जाण्या-येण्याच्या खर्चाचे आमिष दाखवूनही मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे अनेक जण इतर जिल्ह्यातून मजुरांना आणून कापूस वेचणीची कामे करीत आहेत.
उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता
यावर्षीच्या अत्यल्प पावसाने व विविध रोगामुळे धान व कापूस उत्पादनात घट होण्याची चिन्ह आहेत. पिकाला मिळत असलेल्या अल्पशा भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच धान कापणी व कापूस वेचणीला लागणारा खर्च पाहता शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली आहे. धान रोवणीपासून ते कापूस काढण्याच्या मशागतीला लागणारा खर्च वजा करता शेती न परवडण्यासारखी झाली आहे. मजुरांच्या अभावामुळे धानाचे पुंजणे आणि कापसाचे बोंडही शेतकऱ्यांच्या घरात अद्यापपर्यंत पोहोचलेले नाही.