शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा सुरू करावा
By admin | Published: July 30, 2016 01:27 AM2016-07-30T01:27:12+5:302016-07-30T01:27:12+5:30
देशातील गरिबी अजूनही दूर झाली नसून शेतक-यांनी आपले उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे.
हंसराज अहीर : बियाणे वाटप कार्यक्रमात केले आवाहन
घोडपेठ : देशातील गरिबी अजूनही दूर झाली नसून शेतक-यांनी आपले उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. त्याकरिता शेतक-यांनी शेतीसोबतच ईतरही जोडधंदा सुरू करावा असे आवाहन केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे आयोजीत मोफत भाजीपाला बियाणे वाटप व विकासकामांचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
ग्रामपंचायतीच्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी राज्याचे माजी पर्यावरण मंत्री संजय देवतळे, भाजपाचे जिल्हा महामंत्री विजय राऊत, भाजपा तालुकाध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, जि.प. सदस्य विजय वानखेडे, भद्रावती पं.स.च्या सभापती इंदूताई नन्नावरे, मुधोलीच्या सरपंच बेबी चवरे, कोंढेगावचे सरपंच राजू घोडमारे, भाजपा नेते अफजल भाई, तालुका महामंत्री रवी नागपुरे, मुधोली तंटामुक्त समितीचे अध्यक्ष केशवराव जांभुळे, भद्रावती शहर महामंत्री प्रशांत डाखरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी ना. अहीर म्हणाले की, आपल्याकडील शेतकऱ्यांनी मधमाशी पालन, रेशीम किडे उद्योग, दुग्धव्यवसाय यासारखे जोडधंदे करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारे प्रशिक्षण आम्ही देण्यासाठी तयार आहोत. शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हळद या पिकाला जगभर मागणी असून तालुक्यामध्ये हळदीचे उत्पादन वाढवण्याचे त्यांनी शेतक-यांना आवाहन केले. तसेच या परिसरातील सिंचन क्षेत्र दुप्पट केल्याशिवाय तुम्हाला मते मागण्यासाठी येणार नाही असेही ना. अहीर यांनी आवर्जून सांगीतले. (वार्ताहर)