शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:26 AM2021-05-22T04:26:42+5:302021-05-22T04:26:42+5:30
ब्रह्मपुरी : राज्य शासनाने शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली; परंतु अनेक शेतकऱ्यांची अद्यापही कर्जमाफी झाली नाही, तसेच नियमित ...
ब्रह्मपुरी : राज्य शासनाने शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली; परंतु अनेक शेतकऱ्यांची अद्यापही कर्जमाफी झाली नाही, तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात अडकले असून, कर्जमाफी देण्याची मागणी केली जात आहे. यातच कपाशीवर बोंडअळी, लाल्या, मावा, तुडतुडा आदी रोगांनी कहर केला असून, अन्य पीकही रोगांनी ग्रासले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी तूट आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा
वरोरा : शासनातर्फे अल्प प्रमाणात नोकर भरती सुरू असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला. कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे स्वयंरोजगारासाठी बँकेतून कर्ज मागितल्यास निधी नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.
भरधाव धावणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष
वरोरा : शहरातील अनेक मार्गांवर वाहतूकदार भरधाव वेगाने वाहने चालवितात. मात्र, या वाहतूकदारांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे शहरात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत पालकांनीसुद्धा आपल्या पाल्याला मार्गदर्शन करावे, वाहने हळू चालविण्याचा सल्ला द्यावा व समज द्यावी, असे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.
केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा
कोरपना : पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र, अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
राष्ट्रीयीकृत बँकेची स्थापना करा
जिवती : आदिवासी बहुल, अतिदुर्गम, अविकसित तालुका म्हणून जिवती व कोरपना तालुक्याची सर्वदूर ओळख आहे. या तालुकास्तरावर एकही राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने येथील नागरिकांना इतरत्र जाऊन आपली कामे करावी लागतात. त्यामुळे विशेष बाब म्हणून या तालुकास्तरावर राष्ट्रीयीकृत बँक स्थापन करण्यात यावी, अशी मागणी आहे.