उखर्डा येथील शेतकरी पुत्राने मंदिरात सुरू केली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:00:26+5:30
शाळा सुरु नसल्यामुळे गावातील विद्यार्थी दिवसभर खेळण्यात मग्न आहे. त्यामुळे भविष्यात त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांचे नुकसान टाळण्यासाठी अभिजितने शाळा सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र जागेचा अभाव असल्यामुळे त्याने मंदिराच्या जागेची निवड केली. त्याच्या या प्रयत्नाला गावातील काही युवकांनीही सहकार्य केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ऑगस्ट महिना सुरु झाला असतानाही अद्यापही शाळा सुरु झाल्या नाही. त्यातच ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. मात्र हा अभ्यासक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच पालकांना आर्थिक दृष्ट्या संकटात टाकणारा ठरत आहे. त्यामुळे स्वप्रेरणेने जिल्ह्यातील काही युवकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. असाच प्रयत्न वरोरा तालुक्यातील उखर्डा येथील अभिजित प्रभाकर कुडे याने सुरु केला आहे. गावातील विद्यार्थ्यांना मंदिरात बोलावून तो विद्यार्जनाचे काम करीत आहे. यासाठी त्याला गावातील काही युवकही मदत करीत आहेत. त्याच्या या प्रयत्नाचे परिसरात कौतुक केले जात आहे.
शाळा सुरु नसल्यामुळे गावातील विद्यार्थी दिवसभर खेळण्यात मग्न आहे. त्यामुळे भविष्यात त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांचे नुकसान टाळण्यासाठी अभिजितने शाळा सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र जागेचा अभाव असल्यामुळे त्याने मंदिराच्या जागेची निवड केली. त्याच्या या प्रयत्नाला गावातील काही युवकांनीही सहकार्य केले. अभिजित हा वर्धा जिल्ह्यातील न्यु आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज वर्धा येथील पदवीचा विद्यार्थी आहे. लॉकडाऊनमुळे तो गावी परतला आहे.
आपल्या शिक्षणाचा उपयोग गावातील विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी त्याने हा उपक्रम सुरु केला आहे. विद्यार्थ्यांना मंदिरात दुपारी ४ ते ७ वाजेपर्यंत शिकविण्याचे काम सुरु केले. यासाठी ३ वेगवेगच्या बॅच तयार केला. त्याला गावातील रंजीत कुडे, विनोद कोठारे, रोशन भोयर, ऋषिकेश कुडे, तेजस ऊरकुडे, अनिकेत राऊत, तुषार हे सुद्धा मदत करीत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे.
उपक्रमासाठी अनेकांचे सहकार्य
या उपक्रमासाठी न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना बूक, पेन, पेन्सिल तसेच शालेय दिले. यासाठी अमोल घोटेकर, रंजीत कुडे, रोशन भोयर, विनोद कोठारे, विजय कुडे यांनी आर्थिक मदत केली. तर सरपंच मना उईके व उपसरपंच विलास कुडे यांनीहीयासाठी प्रोत्साहन दिल्याने हा उपक्रम गावात चांगल्या प्रकारे सुरु आहे.
विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धां
विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण मिळावे यासाठी विविध प्रेरणादायी उपक्रमही राबविले जात आहे. विविध सामाजिक गोष्टी, गृहपाठ, शुध्द लेखनावर अधिक भर दिला जात आहे. सामाजिक जाणीव व्हावी यासाठी महापुरुषांची माहिती देवून विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे.
लॉकडाऊनमुळे गावातील विद्यार्थ्यांची शाळा बंद आहे. त्यांना शाळेची सवय लागावी, विद्यार्थी इकडे-तिकडे भटकू नये यासाठी हनुमान मंदिरामध्ये गावातील काही युवकांनी शाळा सुरू केली आहे. यासाठी ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनीही त्याा युवकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे मंदिरातील शाळा सुरळीत सुरू आहे.
-मना उईके,सरपंच, उखर्डा